Dashavatar Marathi Movie : मराठी मनोरंजनसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. १२ सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आणि अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने ५.२२ कोटींची कमाई केली आहे. ‘दशावतार’ यंदाच्या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

‘दशावतार’ची टीम सध्या अनेक थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांची प्रत्यक्ष संवाद साधत आहे. तसेच आपला मराठी सिनेमा घराघरांत पोहोचावा यासाठी या चित्रपटातील सगळेच कलाकार प्रयत्न करत आहेत. याशिवाय प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, आरोह वेलणकर या कलाकारांनी सुद्धा ‘दशावतार’ थिएटरमध्ये जाऊन नक्की पाहा असं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे.

सध्या ‘दशावतार’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ मेननचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेता सिनेमा संपल्यावर सर्व प्रेक्षकांसमोर कृतज्ञता व्यक्त करताना दिसतोय.

सिद्धार्थ म्हणतो, “खूप खूप थँक्यू… आम्हाला आतापर्यंत तुम्हा सर्वांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सगळीकडे सिनेमाचे शो हाऊसफुल सुरू आहेत. खरंतर, या सगळ्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. गेली चार वर्षे आम्ही सर्वांनी या सिनेमावर मेहनत घेतली होती आणि आज फायनली जेव्हा सिनेमा तुमच्यासमोर आला तेव्हा तुम्ही तितक्याच प्रेमाने या चित्रपटाला आपलंसं केलंत. मी फार वेळ घेत नाही. थँक्यू सो मच..तुम्हाला सिनेमा आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रमंडळींना सुद्धा नक्की बघायला सांगा. आपल्या मराठी सिनेमाबद्दल चर्चा करा कारण, मराठी सिनेमाला या चर्चेची, या प्रेमाची गरज आहे. अशा एवढ्या मोठ्या संख्येने लोक जर येत असतील तर मराठी सिनेमाला शो का मिळत नाहीत हा प्रश्नच उरणार नाही. कारण, थिएटरमध्ये प्रेक्षक आल्यावर शो नक्कीच मिळतील.”

https://images.loksattaimg.com/2025/09/AQOtZ5Yshni6R0h6omDfqzDOUk-TmM0sxn58NWI8DusjYNEVATZQk0V5yHpiksh4JpKIyH1WWXZuL7g5OAOvLo4XAK4AuST5TrMoX2s.mp4

दरम्यान, ‘दशावतार’ सिनेमाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शोज वाढवण्यात आले आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. या सिनेमात त्यांच्यासह सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, अभिनय बेर्डे, भरत जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.