देशभरातील सिनेप्रेमींच्या मनात सध्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत धुमाकूळ घातला होता. आता सर्वत्र ‘पुष्पा’च्या दुसऱ्या भागाची चर्चा रंगली आहे. यामध्ये देखील दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मे महिन्याच्या अखेरिस या चित्रपटातील “अंगारो सा…” गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

‘पुष्पा २’चं गाणं प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र “अंगारो सा…” गाण्याची क्रेझ निर्माण झाली. मोठमोठे सेलिब्रिटी सध्या ‘पुष्पा’ स्टाइलने या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळालं. हे गाणं बॉलीवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषालच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांत बॉलीवूडच्या कलाकारांसह अनेक मराठी कलाकार देखील या गाण्यावर थिरकले आहेत.

हेही वाचा : ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ चित्रपटात छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कोण साकारणार? अखेर नावं आली समोर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या व अविनाश नारकर, ‘पारू’ व ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील कलाकार, अभिनेत्री स्पृहा जोशी यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी ‘पुष्पा २’च्या गाण्यावर ठेका धरला. आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने “अंगारो सा…” गाण्यावर समुद्रकिनाऱ्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

हेही वाचा : शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेत झळकणार ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेता, साकारणार ‘ही’ भूमिका

‘धर्मवीर’ चित्रपटातील अभिनेता क्षितीश दाते व ‘निवेदिता माझी ताई’ फेम अभिनेता निशाद भोईर यांनी “अंगारो सा…” गाण्यावर डान्स केला आहे. अभिनेता प्रसाद ओकने ‘धर्मवीर’ या सिनेमात आनंद दीघे यांची भूमिका साकारली आहे, तर क्षितीश दाते याने वठवलेली एकनाथ शिंदे यांची भूमिका देखील चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रचंड गाजली. क्षितीश आता ‘पुष्पा’ स्टाइलमध्ये केलेल्या डान्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निशाद आणि क्षितीशचा हा डान्स प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस उतरला आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘पुष्पा’चा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील गाणी व संवाद सोशल मीडियावर हिट ठरले होते. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात ‘पुष्पा २’ चित्रपटाबद्दल सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आहे. अल्लू अर्जुनचा हा बहुचर्चित चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.