मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने सोशल मीडियावर बेधडकपणे बोलत असतात. ते फेसबूकवर राजकारणाबद्दल आणि राजकीय नेत्यांबद्दलही लिहित असतात. आता त्यांनी एक पोस्ट केली आहे, ज्यात भाजपावर खरमरीत टीका केली आहे. टीका करताना त्यांनी काश्मीरपासून ते राम मंदिरापर्यंतचा उल्लेख केला आहे.

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षातील अनेक नेते भाजपावासी झालेत. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडले आणि काही नेते भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले, यावरूनच किरण माने यांनी टोला लगावला आहे. “थोडक्यात काश्मीरपास्नं मंदिरापर्यन्त आदळआपट करूनबी जनसामान्यांच्या मनात स्थान न मिळवल्यामुळं, शिवसेनेचं कुंकू, राष्ट्रवादीचं मंगळसूत्र, काँग्रेसची जोडवी घालायची नामुष्की आलेल्या भाजपाची अवस्था, “सतरा नवरे… एकीला न आवरे!” अशी झालीय… आन् भाजपाच्या कार्यकर्त्यांची अवस्था? आरारारारा… “सतरा लुगडी तरीबी म्या उघडी !” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

“नार्वेकरांनी ‘खरी’ ठरवलेली शिवसेना बाळासाहेबांचं…”, किरण मानेंचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “…ये मेरी गॅरंटी है”

किरण माने यांची फेसबूक पोस्ट

किरण माने यांनी दोन दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना आमदारांवर टीका केली होती. “बाळासाहेबांच्या विचारांच्या, धनुष्यबाण चिन्ह दिमाखात मिरवणार्‍या शिवसेनेला २०१४ मध्ये २० तर २०१९ मध्ये २३ जागा मिळाल्या होत्या… यावेळी ‘हिंदूत्वा’साठी सुरतमार्गे गुवाहाटी गाठणारी, नार्वेकरांनी ‘खरी’ ठरवलेली शिवसेना बाळासाहेबांचं नाव राखण्यासाठी ‘पंचवीस’ जागा तरी मिळवणारच! ये मेरी गॅरंटी है,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली होती.

लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले आहेत. तसेच यंदा राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर किरण माने पोस्ट करून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत.