सचिन मोटे लिखित व सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, इशा डे यांचा हा बहुचर्चित चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. ‘गुलकंद’ या चित्रपटाविषयी नुकतीच पृथ्वीक प्रतापने एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

‘गुलकंद’ चित्रपटाचे प्रीमियरचे फोटो शेअर करत फोटो शेअर करत पृथ्वीक प्रतापने लिहिलं, “उगाच ‘गुलकंद’च्या प्रीमियरला गेलो, त्यापेक्षा…तिकीट काढून सिनेमागृहात जाऊन कुटुंबाबरोबर ‘गुलकंद’ सिनेमा बघायला हवा होता… इतका कमाल सिनेमा बनवलाय यार…उद्या कुटुंबाबरोबर परत जावं लागणारं कारण…इशा डे भाव खाऊन गेलीये…काय genuine काम केलंय. ती स्टार बनण्याचा मार्गावर आहे.”

पुढे पृथ्वीक प्रतापने लिहिलं की, समीर दादा तू जितका निरागस खऱ्या आयुष्यात आहेस. त्यापेक्षा दसपट निरागस मिस्टर ढवळे साकारलायस, मनाला भिडणारा. सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांचे डोळे, त्यातले भाव, कामातली सहजता आणि पात्रांमधली गुंतागुंत यांची खरंतर एक case study असायला हवी.

“सचिन गोस्वामी फक्त विनोदी शैली नाही तर लव्ह स्टोरीज सुद्धा कायच्या काय सहजतेने हाताळतात. बऱ्याच सीन्स मध्ये पात्रांना काहीच बोलू न देता इतकं बोलतं करणं तसं अवघड काम आहे. पण सचिन आला आणि त्याने मैदान नाही गाजवलं असं क्वचितच होतं, किंबहुना होतच नाही आणि त्यात ही दोन सचिन एकत्र असतील तर फक्त शतक नाही, मॅच सुद्धा जिंकणार यावर शिक्कामोर्तब होतं,” असं पृथ्वीकने लिहिलं.

“सिनेमा खूप जवळचा, खूप भिडणारा आणि निर्मळ प्रेम कसं करावं हे शिकवणारा एका महत्त्वाच्या माणसामुळे होतो तो म्हणजे ‘सचिन मोटे’. ‘विवाहबाह्य संबंध’ ही आपली संस्कृती नाही’ याच पुरेपूर भान ठेवून त्यांनी हा सिनेमा लिहिलाय. प्रत्येक सीन गणिक Situation Grow होते आणि गंमत डबल होते. brownie points to the writer. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे… ‘प्रेमाच्या बाबतीत GenZ होऊ पाहणाऱ्या Millenialsने तर हा सिनेमा नक्कीच पाहावा.’ ‘गुलकंद’ आजपासून सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे. नक्की पाहा,” असं आपल्या चाहत्यांना पृथ्वीक प्रतापने आवाहन केलं आहे.

दरम्यान, पृथ्वीक प्रतापच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांसह तो नवनवीन चित्रपटात, जाहिरातींमध्ये काम करताना दिसत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटात पृथ्वीक झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली आणि याचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला. हा पोस्टर पृथ्वीकने सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं, “जय महाराष्ट्र…भेटू लवकरच नव्या भूमिकेत.”