Priya Bapat & Umesh Kamat 14th Anniversary : प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून पाहिलं जातं. लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. आज या दोघांच्या सुखी संसाराला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने प्रियाने खास पोस्ट शेअर केली आहे.

याशिवाय लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या दोघांचं औक्षण दोन खास मराठी कलाकारांनी केलं आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. प्रिया लिहिते, “१४ वर्षे प्रेमाची, एकत्र घालवलेल्या आनंदाच्या क्षणांची आणि वेडेपणाची… यालाच संसार म्हणतात. आपण कायम असेच राहुयात”

प्रिया बापट व उमेश कामत सध्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहेत. याचदरम्यान दोघांनीही लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा केला आहे.

प्रिया-उमेश यांच्यासह ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष गोखले आणि अमोघ फडके या दोघांनी मिळून प्रिया-उमेशचं औक्षण केलं आहे. हा व्हिडीओ आशुतोषने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने, “सालाबादप्रमाणे… लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिया-उमेश” असं कॅप्शन दिलं आहे.

‘दे धमाल’ या मालिकेच्या निमित्ताने उमेशने पहिल्यांदा प्रियाला पाहिलं होतं. त्यानंतर ‘आभाळमाया’ या मालिकेच्या सेटवर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली पण, संपूर्ण शूटिंगदरम्यान दोघंही एकमेकांशी फार बोलले नव्हते. शेवटच्या दिवशी त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले होते. त्यानंतर काही महिन्यांनी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.

https://images.loksattaimg.com/2025/10/priya.mp4

दरम्यान, प्रिया-उमेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर दोघंही नुकतेच ‘बिन लग्नाची गोष्ट’ या सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमाच्या निमित्ताने प्रिया-उमेशची जोडी तब्बल १२ वर्षांनी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. यापूर्वी त्यांनी २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाइमप्लीज’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.