priya berde on role of Jatra Movie: प्रिया बेर्डे या मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे अशा अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर
प्रिया बेर्डे यांनादेखील ओळखले जाते. ‘गृहलक्ष्मी’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एक होता विदूषक’, ‘धरलं तर चावतंय’ अशा अनेक चित्रपटांतून प्रिया बेर्डे यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आताही त्या विविध प्रकल्प, टीव्ही मालिका यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.
आता प्रिया बेर्डे यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाल्यानंतर त्यांना जी भूमिका मिळाली, जत्रा चित्रपटात त्यांनी जी भूमिका साकारली त्यावर वक्तव्य केले आहे.
“हा विचार माझ्या डोक्यात…”
प्रिया बेर्डे या मुलाखतीत म्हणाल्या, “मला पुनरागमन करणं आवश्यक होतं. त्यावेळी हिरोबरोबर डान्स, गाणं करणं या भूमिका करणं शक्य नव्हतं. पण, त्या वयाला अनुसरून केदारने मला भूमिकेची ऑफर दिली. त्यामुळे, आताच लक्ष्मीकांत गेलेत आणि केदारने मला अशा पद्धतीच्या भूमिकेसाठी विचारले आहे, हा विचार माझ्या डोक्यात आलाच नाही .”
“केदारने मला एकच सांगितलं की तुला इथे डान्स वगैरे नाहीये. तुझी इथे सरपंच बाई म्हणून तडफदार भूमिका आहे, त्यामुळे त्याला हो म्हणाले होते. डोक्यामध्ये हा विचारच आला नाही की अशा पद्धतीची भूमिका आहे, आपण करावी की करू नये?
“शेवटी खासगी आयुष्य आणि…”
पुढे प्रिया बेर्डे असेही म्हणाल्या, “शेवटी खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं. त्यावेळेला मला कामाची गरज होती, त्यामुळे मी ती भूमिका आनंदाने स्वीकारली.”
प्रिया बेर्डे यांनी २००५ मध्ये जत्रा: ह्यालागाड ते त्यालागाड या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. केदार शिंदे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, कुशल बद्रिके, भरत जाधव आणि आणखी काही लोकप्रिय कलाकार या चित्रपटात दिसले होते.
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. लोक प्रेमाने त्यांना लक्ष्या अशी हाक मारत. त्यांच्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. तसेच, अशोक सराफ यांच्याबरोबरची त्यांची जोडीदेखील मोठ्या प्रमाणात गाजली.
प्रिया व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी १९९८ ला लग्नगाठ बांधली होती. त्यांना अभिनय व स्वानंदी ही दोन मुले आहेत. १६ डिसेंबर २००४ ला त्यांचे निधन झाले. प्रिया बेर्डे आजही विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता त्यांचा मुलगा अभिनव बेर्डे हा देखील अभिनय क्षेत्रात काम करत आहे. लवकरच तो प्रसाद ओक यांच्या ‘वडापाव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.