Priyadarshan Jadhav on life in Mumbai: ‘गोदावरी’, ‘बाजी’, ‘धिंगाणा’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘मस्का’, ‘टाइमपास’, ‘चोरीचा मामला’, ‘दे धमाल’, ‘सायकल’ अशा चित्रपटांसाठी अभिनेता प्रियदर्शन जाधव ओळखला जातो.

प्रियदर्शनने मराठी चित्रपटांसह त्याने नाटकातही काम केले आहे. अभिनेत्याने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने लेखक म्हणूनदेखील काम केले आहे. आता मात्र तो त्याच्या चित्रपट किंवा भूमिकांमुळे नाही, तर त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

“ती परीक्षा भयंकर…”

अभिनेत्याने नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियदर्शनने मुंबईत वास्तव्यास आला तेव्हाची आठवण सांगितली. तो म्हणाला, “मुंबई शहराची गंमत अशी आहे की, ते बाहेरून आलेल्या माणसाची पराकोटीची परीक्षा बघतं. ते सहजासहजी सामावून घेत नाही. ती परीक्षा भयंकर असते.”

मी मुंबईत भाड्याच्या २२ घरांत राहिल्यानंतर २३ व्या घरात राहिलो. मी माटुंग्याच्या कॅम्प, चाळ, झोपडपट्टीसदृश भागात राहिलेलो आहे. मी बराच काळ सार्वजनिक शौचालय वापरलेलं आहे आणि दुसरीकडे राहिलेलो आहे.”

“माझ्या घराच्या बाजूला तृतीयपंथी राहायचे. तिथे ते ८-१० जण राहायचे. त्यांना लक्षात आलं की, मी सकाळी ७ ला जातो आणि रात्री २ वाजता येतो. एक दिवस त्यांनी मला विचारलं की, तू काय काम करतोस? मी त्यांना सांगितलं की मी नाटक-सिनेमांत काम करतो. ते म्हणाले की, तू सकाळी ७ ला जातोस आणि घरी परत रात्री २ ला येतोस. मी त्यांना म्हणालो की, माझी दिनचर्या अमुक अमुक अशी आहे. तर ते मला म्हणाले की, तुझ्या रूमची किल्ली मिळेल का? आम्ही आठ जण आहोत. आम्हाला फार अडचणीत राहावं लागतं. रात्री आम्ही तुझ्या रूममधून एक-दीडला जाऊ; पण तोपर्यंत चार जण इकडे चार जण तिकडे राहतील. मी त्यांना ठीक आहे म्हणालो.”

“मला त्यांना त्यासाठी होकार देताना, त्यामध्ये काही समस्या आहे, असं वाटलं नाही. भीती वाटली; नाही असं नाही. पण, आपण त्यांना जे समजतो ना, तसे ते अजिबातच नाहीयेत. अगदी आपल्यासारखंच आयुष्य जगणारी ती माणसं आहेत. ते नंतर माझ्यासाठी डबा ठेवू लागले. ते जे जेवायचे, त्यातलं जेवण ते माझ्यासाठी ठेवायचे. भुर्जी, चिकन, असं बरंच काही ठेवायचे.”

मी जिथे राहायचो, तिथले २५ पैसेही कधी चोरीला गेले नाहीत. वस्तू इकडची तिकडे झाली नाही. त्यांनी काही घाण करून ठेवली आहे, वस्तू कशाही टाकून निघून गेलेत, असं कधीच झालं नाही. माझ्याकडे तेव्हा ९६०२१४९०२९ नावाचा पेजर होता. तो लक्षात राहिला. कारण- ते सतत मला एसटीडी (STD) पीसीओ बूथवरून मेसेज करायचे. अंडा भुर्जी, असा मेसेज ते करायचे. मग मला कळायचं की, आज अंडा भुर्जी आणली आहे. त्यातले एक-दोन कधीतरी अजूनही भेटतात. अशी ही मुंबई आहे, असे त्याने आठवण सांगताना स्पष्ट केले.