Dashavatar Movie : ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दशावतार’ सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुद्धा दमदार कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: दिलीप प्रभावळकरांनी साकारलेली बाबुली मेस्त्रीची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावलीये. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच ‘दशावतार’ हा सिनेमा प्रत्येकाने पाहावा असं आवाहन महाराष्ट्रातील नागरिकांना केलं होतं. उद्धव ठाकरेंनी सुद्धा हा चित्रपट सहकुटुंब पाहिला आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं. आता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ‘दशावतार’ सिनेमा पाहिल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शर्मिला ठाकरेंना ‘दशावतार’ सिनेमा कसा वाटला?
“आताच मी ‘दशावतार’ सिनेमा पाहिला. मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. राजचं जे म्हणणं असतं आणि त्याच्या भाषणात देखील अनेकदा त्याने सांगितलंय की, कोकणातील जमिनी आपण विकू नयेत. यामुळे निसर्गाची सुद्धा वाट लागतेय, हा संदेश सिनेमातून देण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येकाने पाहायला पाहिजे असा हा सिनेमा आहे. अजून एक गोष्ट म्हणजे… मी दिलीप काकांना मनापासून नमस्कार करेन. त्यांनी इतकं अप्रतिम काम केलंय की, माझ्याकडे शब्दच नाहीयेत. वयाची ऐंशी वर्षे ओलांडूनही त्यांची एनर्जी कमाल आहे. त्यांचा अभिनय पाहून मी एकच गोष्ट बोलेन… हॅट्स ऑफ! बाकी कलाकारांनी सुद्धा खूपच सुंदर काम केलंय. सुबोधचं ( दिग्दर्शक ) सुद्धा कौतुक करेन कारण, या सिनेमाच्या माध्यमातून त्याने कोकणात अप्रतिम शूटिंग केलं आहे. सिनेमात कोकण पाहूनच आम्ही तृप्त झालो. हा सिनेमा नक्की बघा.”
दरम्यान, ‘दशावतार’ ( Dashavatar Movie ) या सिनेमाने गेल्या १२ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १९ कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये दिलीप प्रभावळकर यांच्यासह सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, अभिनय बेर्डे, रवी काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.