Sayali Sanjeev shares anecdote: ‘काहे दिया परदेस’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘ओले आले’ अशा मालिका आणि चित्रपटांतून अभिनेत्री सायली संजीवने अभिनय क्षेत्रात तिची स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली आहे.

सायली संजीवच्या अभिनयाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सायली संजीवने चाहत्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक जण तिला लग्नाची मागणी घालतात. तसेच अशोक सराफ यांची ती मुलगी असण्याबाबतदेखील विचारतात, असे तिने सांगितले.

“दोन दिवसातून एकदा…”

अभिनेत्रीने नुकतीच ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. चाहत्यांबरोबर एक खास बॉण्डिंग असल्याचे सायलीने या मुलाखतीत सांगितले. तसेच काही किस्सेदेखील सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या इन्स्टाग्रामच्या पेजवर माझा ई-मेल आयडी आहे. कामाचे ई-मेल येण्यासाठी तो आयडी मी तिथे लिहिलेला आहे. कारण- अनेक लोकांकडे आपला फोन नंबर नसतो आणि खासगी नंबर देऊही शकत नाही. पण, त्या ई-मेल आयडीवर दिवसातून एकदा किंवा दोन दिवसातून एकदा तू माझ्याशी लग्न करशील का, असा मेल असतो. वेगवगेळे लोक असे मेल करतात.

पुढे अभिनेत्री म्हणाली, “मध्यंतरी मी कुठल्या तरी कार्यक्रमाला गेले होते. त्या कार्यक्रमात मला एक गृहस्थ भेटले. ते मला म्हणाले की, तू अशोक सराफांची मुलगी आहेस ना? मी त्यांना म्हणाले की हो, मी त्यांची मानलेली मुलगी आहे. त्यावर ते मला म्हणाले की, तू त्यांची खरी मुलगी आहेस ना? मी त्यांना म्हणाले की, ते मला मुलगी मानतात. पण, माझे खरे आई-वडील वेगळे आहेत.

“तर ते मला म्हणाले की, तू अशोक सराफांची मुलगी आहेस. मी त्यांना सांगितलं की, नाही काका, माझ्या वडिलांचं नाव संजी आणि आईचं नाव शुभांगी आहे. सायली संजीव म्हणूनच मी माझं नाव लावते. तर ते माझ्यावर ओरडले. ते म्हणाले की, शक्यच नाही. हे शक्यच नाही. मी त्यांना सांगितलं की, माझे वडील वेगळे आहेत. त्यावरही ते म्हणाले की तू अशोक व निवेदिता सराफ यांची मुलगी आहेस. मी त्यांना ओके म्हटले. त्यांना ऐकायचंच नव्हतं.”

दरम्यान, याच मुलाखतीत सायलीने ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात का सक्रिय नसते, यावरदेखील वक्तव्य केले आहे.