लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. हा चित्रपट म्हणजे ‘सुभेदार’. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता या ट्रेलरने नवीन विक्रम केला आहे.
‘सुभेदार’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्या वेळेची सामाजिक परिस्थिती, तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील मैत्री, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई साहेब यांच्यातील नातं, कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी केलेली लढाई, तर दुसरीकडे मालुसरे कुटुंबामध्ये सुरू असलेली रायबाच्या लग्नाची लगबग हे सगळं पाहायला मिळत आहे. तर या ट्रेलरमधील डायलॉग्सनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
हा ट्रेलर पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी हा ट्रेलर आवडल्याचं सांगत आहेत. हा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रचंड व्हायरल झाला. तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर एका दिवसातच त्याने नवा विक्रम नोंदवला आहे. हा ट्रेलर यू ट्यूबवर १ नंबरवर ट्रेंड होत असून हा आतापर्यंतच्या सगळ्या मराठी चित्रपटांच्या ट्रेलर्सपैकी सर्वात कमी वेळात सर्वात जास्त पहिला गेलेला ट्रेलर बनला आहे.
दरम्यान, सुभेदार हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळी, समीर धर्माधिकारी अशी तगड्या कलाकारांची कास्ट आहे.