‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘बिग बॉस ओटीटी’बद्दल नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शोच्या निर्मात्यांनी अधिकृत सोशल मीडिया पेजवर एक पोस्टर शेअर करत तुम्हाला शोमध्ये कोणाला पाहायला आवडेल अशी विचारणा केली होती. मात्र, नंतर निर्मात्यांनी ही पोस्ट डिलीट केली. यामुळेच सलमान खान यापुढे ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करू शकणार नाही असा समज सर्वांनी करून घेतला आहे. अशातच आता वाहिनीकडून एक नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बिग बॉस’च्या सेटचं बांधकाम सुरू असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसकडून एप्रिलमध्येच देण्यात आली होती. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांना शोच्या होस्टबद्दल एक हिंट मिळाली आहे. शूटिंग आणि शेड्यूलच्या तारखांमुळे सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करणार नाही अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. भाईजानची जागा करण जोहर, संजय दत्त किंवा अनिल कपूर घेऊ शकतात, अशी चर्चा होती. पण, नव्या प्रोमोमुळे अनिक कपूर यांना ही संधी मिळू शकते अशी शक्यता आहे.

हेही वाचा : “माझी बहीण, सखी, मैत्रीण”, तेजस्विनी पंडितच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; म्हणाली, “तेजू आयुष्यभर…”

‘बिग बॉस ओटीटी’च्या प्रोमोमध्ये सांगतात, “ये सीजन होगा खास एकदम झक्कास.” ‘झक्कास’ या शब्दामुळे यंदा होस्ट म्हणून अनिल कपूर यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु, वाहिनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा : “तब्बल ८ तास विलंब”, नामांकित विमान कंपनीवर मराठी अभिनेत्री संतापली; म्हणाली, “कारवाई…”

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनच्या हाती लागला मोठा पुरावा, साक्षीचा डाव फसणार? सुरू होतोय मालिकेचा महासप्ताह, पाहा प्रोमो

‘बिग बॉस ओटीटी’च्या नवीन प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बिग बॉस ओटीटी’चा पुढचा सीझन पाहिल्यानंतर तुम्ही बाकी सर्व विसरून जाल. कारण हा सीझन खास असेल! एकदम झक्कास’. ‘झक्कास’ या शब्दामुळे यावेळी बिग बॉस ओटीटीचं होस्टिंग अनिल कपूर करणार असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल कपूर यांच्याकडून शो होस्ट करण्यासाठी मानधन म्हणून मोठी रक्कम घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे. आता प्रत्यक्ष ‘बिग बॉस ओटीटी’ नेमकं कोण होस्ट करणार याचा उलगडा लवकरच वाहिनीकडून करण्यात येणार आहे.