Jolly LLB 3 OTT Release : अनेक जण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा घरी बसून चित्रपट पाहण्याला पसंती देतात. तर, काही जण चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात न जाता आल्याने तो चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची प्रतीक्षा करीत असतात. येत्या काळात अनेक मोठ्या पडद्यावर यशस्वी ठरलेले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे ‘जॉली एलएलबी ३’ हा सिनेमा.

अक्षय कुमार व अर्शद वारसी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट जर तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन पाहता आला नसेल, तर आता तो तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. चला तर जाणून घेऊयात हा चित्रपट कुठे आणि कधीपासून पाहायला मिळेल?

‘या’ तारखेला प्रदर्शित होणार जॉली एलएलबी ३

अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट १४ नोव्हेंबरला ओटीटीवर रीलिज होणार असून, हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ व ‘जिओ हॉटस्टार’वर तुम्हाला पाहता येईल. ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा हा तिसर भाग असून, यापूर्वीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर, या तिसऱ्या भागात अक्षय कुमार, अर्शद वारसी, अमृता राव, सौरभ शुकला, हुमा कुरेशी, सीमा बिस्वास, गजराज राव हे कलाकार पाहायला मिळतात.

चित्रपटाची कथा जगद्वीश्वर जॉली मिश्रा (अक्षय कुमार) याच्याभोवती फिरते. तो स्थानिक लोकांनी दाखल केलेल्या जमिनीच्या बेकायदा ताब्याच्या प्रकरणात एका प्रभावशाली राजकारण्याविरुद्ध केस लढत असतो. त्याच्या विरोधात जगदीश म्हणजेच जॉली त्यागी (अर्शद वारसी) हा वकील आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होतात; पण त्यांची मतं बदलतं जेव्हा ते जानकीला भेटतात. एक शेतकरी विधवा महिला, जी आपल्या जमिनीवरचा अन्याय दूर करण्यासाठी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.