98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 Inauguration: राजधानी दिल्लीत पार पडत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेचे गोडवे गायले. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये बोलत असताना त्यांनी मध्ययुगीन काळापासून ते अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईपर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचा आणि महापुरूषांचा उल्लेख करून त्यांना वंदन केले. “मराठीचा जेव्हा जेव्हा विषय येतो, तेव्हा मुंबई आणि चित्रपटांचा विषय आल्याशिवाय राहत नाही. मुंबईनेच मराठी आणि हिंदी चित्रपटांना उभारी दिली. आता तर ‘छावा’ची धूम आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात जय भवानी, जय संभाजी अशा घोषणा दिल्या गेल्या. टाळ्यांच्या कडकडाट करत उपस्थितांनी दाद दिली. यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कांदबरीने करून दिला.

मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे यांनी त्याकाळात शत्रूंना पराभूत करून जेरीस आणले. ब्रिटिश काळात वासूदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर सारख्या सेनानींनी ब्रिटिशांची झोप उडवली. त्यांनीही मराठी भाषा आणि साहित्यात अभूतपूर्व असे योगदान दिले. केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी भाषेला आकार दिला. मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेमाचा ज्वर दिसून आला. संपूर्ण राष्ट्राची मशागत या साहित्याने केली. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य मराठीत लिहिले. त्यांच्या रचनेने देशभरात एक ऊर्जा संचारली.

अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे भाग्य लाभले

जगभरात १२ कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा, यासाठी कोट्यवधी लोक दशकांपासून वाट पाहत होते. काही महिन्यांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे कार्य माझ्या हातून झाले. हे माझे भाग्य समजतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, मराठी भाषेचा जन्म संस्कृतमधून झाला. पण मराठीवर प्राकृत भाषेचाही तेवढाच प्रभाव आहे. पिढी दर पिढी मराठी भाषेने कूस बदलत ती पुढे जात राहिली. या भाषेने मानवी विचारांना आणखी व्यापक बनविले. लोकमान्य टिळकांनी संस्कृत गीतेमधून विचार घेतले आणि मराठी बोध घेऊन गीतारहस्यच्या माध्यमातून त्याला आणखी सुलभ बनविले. संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानश्वरीमधून गीतेचा सार मांडला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi praises chhava movie in marathi sahitya sammelan inauguration speech kvg