मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटला तुम्ही आजपर्यंत नाटक, मालिका व सिनेमांमध्ये पाहिले असेल. जितकी पसंती तिला आतापर्यंत छोट्या आणि रूपेरी पडद्यावर मिळत होती, तितकीच आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा दिसून येतेय. अभिनेत्री प्रिया बापटने २०१९ मध्ये डिजीटल प्लॅटफॉर्मवर पहिलं पाऊल टाकलं होतं. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या तिच्या पहिल्या वहिल्या वेबसिरीजमधून तिने वेबविश्वात एन्ट्री केली होती. त्यानंतर ती उमेश कामतसोबत ‘आणि काय हवं?’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीजनच्या यशानंतर तिसरा सीजन देखील भेटीला येणार आहे. या सीरिजच्या सीजन ३ ची शूटिंग पूर्ण झाली असून रिलीजसाठी सज्ज झालीय.
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ असे बिरुद मिळविलेला उमेश कामत आणि त्याची अभिनेत्री पत्नी प्रिया बापट ही लोकप्रिय जोडी एम. एस. एक्स्क्लुझिव्हच्या ’आणि काय हवं?’च्या’ या वेब सीरिजच्या निमित्ताने पडद्यावर एकत्र झळकले होते. या सीरिजच्या सीजन १ आणि सीजन २ ने प्रेक्षकांची तुफान लोकप्रियता मिळविली होती. त्यामुळे आता या सीरिजचा सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. प्रियाने नुकतंच या वेब सिरीजच्या सीजन ३ चे शूटिंग पूर्ण केले आहे. खरं तर चार महिन्यांपूर्वीच या वेब सीरिजच्या सीजन ३ ची घोषणा करण्यात आली होती. अभिनेत्री प्रिया बापट हीने स्वतः इन्स्टाग्रामवर सीरिजमधल्या सर्व क्रू-मेंबर्सचा एक फोटो शेअर करत याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांचा हा प्रोजेक्ट ठप्प झाला होता.
आता अनलॉकमध्ये शूटिंग परत सुरू करण्यात आली आहे. करोनाचा कहर, लॉकडाउनचे विविध टप्पे आणि त्यातील सर्व अडचणींवर मात करत ‘आणि काय हवं?’ च्या सीजन ३ ची शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आली होती. गेला काही काळ अभिनेत्री प्रिया बापट या सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. अनलॉक नंतर या सीरिजची राहिलेली शूटिंग पूर्ण करण्यात आलीय. प्रिया बापट हिने अनलॉकनंतर सुरू झालेल्या शूटिंगमधला आलेला अनुभव सुद्धा शेअर केला. “करोनाचा कहर पाहता आवश्यक ती सर्व सुरक्षितता आणि खबरदारी घेत या सीरिजचं शूटिंग करणं खूप अवघड गेलं. तसंच सेटवर कुणीही करोनाला हलक्यात घेतलं नाही”, असं प्रियाने सांगितलं.
यापुढे बोलताना प्रिया म्हणाली, “शूटिंग सुरू करण्यापूर्वी आणि त्यानंतर ठराविक काळाच्या अंतराने क्रू-मेंबर्समधील सर्व सदस्य आपल्या चाचण्या करून घेत होते. फक्त मेकअप आणि शूट सोडलं तर इतरवेळी सर्व सदस्यांनी तोंडावर डबल मास्क लावलेला होता.”, असं प्रियाने सांगितलं. तसंच “आता आपल्याला आणखी सावध रहायला हवं. कामावर जाणं गरजेचंच आहे, कारण कित्येक लोकांचं हातावरचं पोट आहे. आपल्या सर्वांना कायम परिक्षण, स्वच्छता आणि करोना नियमांचं पालन केलं पाहिजे”, असं आवाहन देखील यावेळी प्रियाने केलं.
तर उमेश कामत याने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फनी एक्सप्रेसनचा एक फोटो शेअर करत सीरिजच्या सीजन ३ ची शूटिंग पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं, “फायनली… ‘आणि काय हवं’ season 3….Shooting संपल्यानंतरचे expressions….”.
सीरिजच्या पहिल्या भागात जुई आणि साकेत यांच्यात खुलणारं प्रेम दाखविण्यात आलं होतं. तर दुसऱ्या सिझनमध्ये त्यांच्या लग्नाला ३ वर्ष झाली असून या नात्यातील गोडवा, रुसवे-फुगवे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानंतर आता सीजन ३ कोणती कहाणी घेऊन येणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.