सध्या सगळीकडेच टॉक शोची चर्चा आहे. करण जोहरचा बहुचर्चित कॉफी विथ करण हा कार्यक्रमसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे. याच पठडीतला असाच एक कॉमेडी टॉक शो amazon शॉपिंगच्या साईटवर मिनी टीव्ही या सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याचं नाव आहे ‘केस तो बनता है’.

या कार्यक्रमाचे स्वरूप आपल्याला थोडेफार ‘आप की अदालत’शी मिळते जुळते वाटू शकते. पण या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती केली जाते. २९ जुलै रोजी हा कार्यक्रम सुरू झाला आणि आजवर या कार्यक्रमात विकी कौशल, अनिल कपूर, वरुण धवन, करीना कपूर अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. नुकताच या कार्यक्रमाच्या पुढील भागाचाएक टीझर व्हायरल झाला असून यामध्ये आपल्याला करण जोहर दिसणार आहे.

या कार्यक्रमात रितेश देशमुख, वरुण शर्मा, सुगंधा मिश्रासारखे कलाकार आपल्याला बघायला मिळतात. आगामी एपिसोडमध्ये करण जोहरबरोबर या लोकांनी खूप धमाल आणि मस्ती केली असल्याचं या टीझरवरुन लक्षात येत आहे. तसंच या कार्यक्रमात करणला त्याच्या कॉफी विथ करणप्रमाणे धर्मसंकटात टाकणारे प्रश्न विचारल्याचंसुद्धा स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेंडबद्दल ट्वीट केल्याने अभिनेत्री स्वरा भास्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर; म्हणते “बॉयकॉट बॉलिवूड हा तर…”

हा कार्यक्रम कोणत्याही चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नसून केवळ मनोरंजनासाठी आहे हे या ट्रेलरवरुन समजतं. येत्या ९ सप्टेंबरला हा नवाकोरा भाग तुम्ही amazon शॉपिंग अॅपमधील मिनी टीव्ही या सेक्शनमध्ये मोफत पाहू शकता.