Raj Kundra Reveals Parents First Reaction about Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा नेहमीच चर्चेत असलेले जोडपे आहे. २००९ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या संसाराला १६ वर्षे झाली आहेत. फराह खानच्या व्लॉगमध्ये नुकतेच दोघेही दिसले. त्यावेळी शिल्पाबद्दल राजच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने फराह खानच्या व्लॉगमध्ये शिल्पाला डेट करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले. उद्योगपती राज कुंद्राने सांगितले की, तो पहिल्याच नजरेत अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या प्रेमात पडला होता.
राजचे वडील सुरुवातीला खूप उत्साहित होते की, त्यांचा मुलगा एका अभिनेत्रीला डेट करीत आहे. पण, नंतर त्यांची प्रतिक्रिया ऐकून फराह आणि शिल्पा दोघांनाही हसू आवरणे कठीण झाले.
राज कुंद्रा म्हणाला, “माझे वडील म्हणायचे, माझ्या वडिलांना कळलं होतं की, मी एका अभिनेत्रीला डेट करीत आहे. तर सुरुवातीला ते खूश होते. पण जेव्हा लग्नाची गोष्ट आली तेव्हा ते नाराज झाले. त्यांना वाटलं की ती अभिनेत्री आहे म्हणजे ती दारू पीत असेल, सिगारेट ओढत असेल; पण मग मी त्यांना समजावलं की, शिल्पाबद्दल काहीही विचार करायच्या आधी तुम्ही तिला एकदा भेटा आणि मगच निर्णय घ्या.”
माझे सासू-सासरे मला प्रेम करतात… : शिल्पा शेट्टी
राज कुंद्राने विनोद केला की, त्याच्या आई-वडिलांनाही पहिल्याच नजरेत शिल्पा आवडली. शिल्पा शेट्टी कुंद्रा नंतर हसली आणि म्हणाली, “माझे सासू-सासरे मला राजपेक्षा जास्त प्रेम करतात.” शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा फराह खानच्या अलीकडच्या व्लॉगमध्ये एकत्र दिसले होते. दोघांनीही वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आघाडीपर्यंत सर्व गोष्टींबद्दल खूप काही बोलले.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांची पहिली भेट २००७ मध्ये झाली होती जेव्हा शिल्पा एक ‘परफ्यूम’ सीरिज सुरू करीत होती. राज कुंद्रा अभिनेत्रीला प्रमोशनमध्ये मदत करीत होता. शिल्पा आणि राज कुंद्रा यांचे नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न झाले. २०१२ मध्ये त्यांना पहिले मूल झाले, ज्याचे नाव त्यांनी विवान ठेवले. नंतर हे जोडपे सरोगसीद्वारे पालक बनले आणि त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव समीशा ठेवले.