ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवसांनंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम जाहीर करण्यात आला आहे. ही बातमी ऐकताच सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भारत-पाकिस्तान शस्त्रविरामावर अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान खाननेदेखील ट्विट केले आहे.
पण, सलमान खानला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामासंदर्भात त्याने दिलासा व्यक्त करणारे ट्विट केले. पण, नंतर त्याने हे ट्विट डिलीट केले. सलमानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “देवाचे आभार, शस्त्रविराम झाले…”
शस्त्रविराम जाहीर झाल्यानंतर सलमान खानने ट्विट केले आणि नंतर ते डिलीट केले. शस्त्रविरामावर पोस्ट केल्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली. कारण याआधी सलमानने भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरावर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर एकही शब्द बोलला नव्हता. त्याने याबद्दल सार्वजनिकरित्या कोणतेही विधान केले नाही किंवा सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले नाही.
सलमानबद्दल अनेक जण वाईट बोलले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “भारताच्या वेदनांबद्दल काही बोलण्याऐवजी, सलमानला पाकिस्तानच्या कल्याणाची जास्त काळजी वाटत होती.” त्याच वेळी एकाने लिहिले की, “तो फक्त देशभक्तीवर चित्रपट बनवेल, पण प्रत्यक्षात दाखवणार नाही.”
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सलमान खानने ट्विट केले नाही
सलमान खानच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सलमान खानने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा त्याने कोणतेही नवीन ट्विट केलेले नाही. एका वापरकर्त्याने लिहिले, “सलमान खानने त्याचे ट्विट डिलीट केले, पहलगामवर काहीही पोस्ट केले नाही. तसेच शाहरुख खान आणि आमिर खानदेखील गप्प राहिले.”
काय कारण असू शकते?
सलमान खानने अद्याप या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, सर्व गोष्टींचा विचार करता अभिनेत्याने त्याच्या पोस्टच्या वेळेमुळे ते डिलीट केले असावे. कारण सलमानने ९ वाजून ९ मिनिटानंतर पोस्ट शेअर केली होती, पण तोपर्यंत पाकिस्तानने शस्त्रविरामचे उल्लंघन केले होते. जर आपण सध्याच्या परिस्थितीबद्दल बोललो तर दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे.