Sridevi Crash Diet : बॉलीवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी एकेकाळी देशातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. मोठी स्टार असूनही अभिनेत्री श्रीदेवी यांना त्यांच्या लूक आणि वजनासाठी खूप टीकेचा सामना करावा लागला होता.

इंडस्ट्रीकडून श्रीदेवी यांच्यावर परिपूर्ण दिसण्यासाठी दबाव होता. १९९१ मध्ये जेव्हा राम गोपाल वर्मा श्रीदेवी यांच्याबरोबर ‘क्षण क्षणम’ चित्रपटात काम करत होते, तेव्हा त्यांनी अभिनेत्रीवर वजन कमी करण्यासाठी खूप दबाव आणला होता.

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी एकदा खुलासा केला होता की त्या क्रॅश डाएटवर होत्या. अभिनेत्रीने मीठ खाणे सोडून दिले होते.

आता श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी, चित्रपट दिग्दर्शक पंकज पराशर यांनी याबद्दल सांगितले आहे. त्यांनी चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल म्हटले आहे की, ते नेहमीच अभिनेत्रीवर बारीक राहण्यासाठी दबाव आणत असत.

फ्रायडे टॉकीजला दिलेल्या अलीकडील मुलाखतीत, पंकज पराशर यांनी त्यांच्या अपूर्ण चित्रपट ‘मेरी बीवी का जवाब नहीं’ च्या प्रदर्शनात झालेल्या विलंबाबद्दल सांगितले. ‘त्यांनी सांगितले की चित्रपट चांगला चालला होता, परंतु मी यासाठी माझा मित्र राम गोपाल वर्माला जबाबदार धरतो, कारण तो श्रीदेवीला वजन कमी करण्यास सांगत राहिला.”

श्रीदेवी बेशुद्ध पडली, तिचा दात तुटला : पंकज पराशर

पंकज पराशर पुढे म्हणाले, “ती (श्रीदेवी) खूप जास्त डाएट करत होती आणि असे केल्याने तिने मीठ खाणे बंद केले, तिचा रक्तदाब कमी झाला आणि ती बेशुद्ध पडली. ती बेशुद्ध पडली आणि टेबलावर आदळली आणि २० मिनिटे बेशुद्ध होती. तिचा एक दात तुटला. अशाप्रकारे आमचे संपूर्ण वेळापत्रक उद्ध्वस्त झाले. चित्रपट रुळावरून घसरला, फायनान्सर निघून गेला, निर्माता मरण पावला, हे सर्व घडले म्हणून मी चित्रपट सोडला.”

‘मेरी बीवी का जवाब नहीं’मध्ये श्रीदेवी यांच्याबरोबर अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. कॉफी विथ करणच्या एका भागात अक्षय कुमारही या चित्रपटाबद्दल बोलला होता. अभिनेता म्हणाला होता की, तो या चित्रपटाचा क्लायमॅक्सही शूट करू शकला नव्हता. अशा परिस्थितीत हा चित्रपट २००४ मध्ये चित्रपटगृहात अपूर्ण प्रदर्शित झाला. सॅकनिल्कच्या मते, ‘मेरी बीवी का जवाब नहीं’ चित्रपटाचे बजेट २.२५ कोटी रुपये होते. तो फक्त ३५ लाख रुपये कमवू शकला.