बॉलीवूडमध्ये अनेकदा असे प्रसंग आले आहेत, जेव्हा मोठ्या अभिनेत्रींनी सुपरस्टार्सबरोबर काम करण्यास नकार दिला आहे. असाच एक किस्सा त्यावेळी समोर आला जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा चित्रपट नाकारला होता. ती अभिनेत्री कोण आहे आणि त्यामागचे कारण काय होते ते जाणून घेऊया.

तब्बू ही बॉलीवूडमधील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या कारकिर्दीत असंख्य हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.

पण, अभिनेत्रीने बॉलीवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट नाकारला होता. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा ‘बागबान’ हा हिट चित्रपट तिने नाकारला होता.

या चित्रपटात तब्बूला अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. ‘बागबान’च्या निर्मात्या रेणू चोप्राने एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, तिने चित्रपटाची कथा तब्बूला सांगितली होती. तब्बूला ही कथा खूप आवडली आणि ती ऐकून ती रडूही लागली होती.

नंतर तब्बूला चार मुलांच्या आईची भूमिका करायची नव्हती म्हणून तिने ही भूमिका नाकारली. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्याने ३० कोटी रुपये कमावले.

तब्बूने तिच्या ३० ते ४० वर्षांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. केवळ बॉलीवूडच नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांबरोबर तिने उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. चित्रपटांबरोबरच तब्बू तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. आजही ती तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसते. ५३ वर्षीय तब्बू आजही अविवाहित आहे.

तब्बू सध्या अक्षय कुमारबरोबर एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तब्बू ‘भूत बंगला’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात परेश रावलदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि तब्बू हे दोघे तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र काम करीत आहेत. बऱ्याच काळानंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमार एकत्र काम करीत आहेत.