अभिनेते किरण माने हे ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामुळे घराघरांत लोकप्रिय झाले. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. गेल्यावर्षी अभिनेते ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झाले होते. याला आता बरोबर १ वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील अनुभव, त्यांना या कार्यक्रमामुळे मिळालेली प्रसिद्धी याविषयी सांगितलं आहे. किरण माने त्यांच्या पोस्टद्वारे नेमकं काय सांगतात? जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सरधोपट मांडणीत अडकलेली रंजक कथा

अभिनेते किरण मानेंची पोस्ट

१ ऑक्टोबर…आज एक वर्ष झालं ‘बिग बॉस’च्या त्या नादखुळा घरात पाऊल ठेवलेल्याला.
अजूनबी विश्वास बसत नाय भावांनो…तब्बल शंभर दिवस टिकून राहिलो त्या घरात!
या घरानं माझं आयुष्य लखलखीत करुन टाकलं… संघर्षाचं सोनं केलं… नव्हत्याचं होतं केलं… माझ्या चाहत्यांना पराकोटीचा आनंद दिला… मला पूर्वी ट्रोल करणारेबी प्रेमात पडले, चाहते झाले… द्वेष करणार्‍यांची बोलती बंद झाली… तिथनं परतल्यावर राजधानी सातार्‍यात पाऊल ठेवल्या-ठेवल्या माझ्यावर प्रेम करणार्‍यांनी माझी जल्लोषात मिरवणूक काढली ती आयुष्यभर विसरणार नाय गड्याहो!

ह्या जादूई घरात पाऊल ठेवण्याआधी आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादळाला तोंड दिलं होतं. बलाढ्य यंत्रणेविरुद्ध जीवाच्या आकांतानं लढलो होतो. काळजावर झालेल्या खोट्या आरोपांच्या जखमा ओल्या होत्या. वेदनांनी घुसमटलो होतो. त्यामुळं आता हा माझ्यासाठी खेळ राहिला नव्हता, स्वत:ला सिद्ध करायची शेवटची संधी होती.

मी जिद्दीची, चिकाटीची, धाडसाची, स्वत्वाची, सत्वाची परीसीमा गाठली… शारीरीक-मानसिक दोन्ही बळामध्ये निम्म्या वयाच्या तरण्याबांड पोरांना जबरी टक्कर देऊन चारी मुंड्या चित केलं… ज्यांना मित्र मानलं त्यांच्यासाठी मात्र सर्वस्व उधळलं.

या घरानं मला तेजस्विनी लोणारी सारखी जिवाला जीव देणारी आयुष्यभराची मैत्रीण दिली. राखीबरोबर केलेले हेल्दी फ्लर्टिंग बाहेर प्रेक्षकांनी फुल्ल एंजॉय केले. विक्याबरोबर नंतर-नंतर बिनसलं, पण तरीबी आम्ही दोघांच्या मैत्रीनं पहिले पाचसहा आठवडे अख्ख्या घराला भुंगा लावलावता. त्याच्याबरोबरचे ते दिवस अद्भूत होते !

हा जो व्हिडीओ हाय… तो ‘फायनॅलिस्ट’ म्हणून बिगबॉसनं मला केलेला ‘सॅल्यूट’ होता… माझं कौतुक करताना बिगबॉसनं जे शब्द वापरलेत ते कायमचे काळजात कोरून ठेवलेत. ‘अजिंक्य तारा… द किरण माने’ ! माझ्या मनावरच्या सगळ्या जखमा भरून काढणारं, ते माझं जगातलं सगळ्यात मौल्यवान अवॉर्ड हाय हे…
लब्यू बिगबॉस.

किरण माने.

हेही वाचा : सई परांजपे पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; नव्या नाटकाचा दसऱ्याला मुहूर्त

दरम्यान, किरण माने ‘बिग बॉस’ मराठीचं चौथं पर्व जिंकू शकले नाहीत. परंतु, घरात १०० दिवस राहून त्यांनी शेवटपर्यंत बाजी मारली. त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ते सिंधुताई माझी आई या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत किरण माने सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane emotional post for big boss marathi show sva 00