scorecardresearch

Premium

सरधोपट मांडणीत अडकलेली रंजक कथा

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट दोन गोष्टींसाठी फार महत्त्वाचा ठरतो. कोविडकाळात संपूर्ण देश एका भयंकर मानसिक उद्वेगातून जात असताना आपण आपल्या लोकांना वाचवण्यासाठी काय करू शकतो?

the vaccine war
‘द व्हॅक्सिन वॉर’

रेश्मा राईकवार

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट दोन गोष्टींसाठी फार महत्त्वाचा ठरतो. कोविडकाळात संपूर्ण देश एका भयंकर मानसिक उद्वेगातून जात असताना आपण आपल्या लोकांना वाचवण्यासाठी काय करू शकतो? हा विचार इथल्या शास्त्रज्ञांनी सुरू केला. करोनाचं थैमान थोपवण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय घेण्यापासून ते या विषाणूवर जालीम उपाय म्हणून आपल्या देशात लसनिर्मिती करायचीच हा विडा उचलत त्यासाठी दिवसरात्र एक करणारे हे शास्त्रज्ञ सुपरहिरोंपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या प्रयत्नांची गाथा सांगताना या शास्त्रज्ञांमध्ये ७० टक्के स्त्रिया होत्या हे ठळकपणे दिग्दर्शकाने मांडले आहे. वास्तव शैलीचा आधार घेत यातले नाटय़ रंजकतेने प्रेक्षकांसमोर मांडण्यात मात्र विवेक अग्निहोत्रींना यश आलेले नाही. माहितीपटाच्या साच्यातील हा चित्रपट काहीशा सावधपणे प्रचारकी थाटात सरकारचे गुणगान गातो हेही लपलेले नाही.

Marathi actress Prajakta Mali
व्हॅनिटी व्हॅन नसल्यामुळे परदेशात ‘या’ अडथळ्यांना सामोर जावं लागतं, प्राजक्ता माळीने सांगितला अनुभव, म्हणाली…
the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
meri umar ke berojgaro
Video: “मेरी उमर के बेरोजगारो..जाति-धरम के चष्मे उतारो”, सोशल मीडियावर गाण्याचा धुमाकूळ!
avinash narkar and aishwarya narkar
“डान्स करणं हा माझ्यासाठी फोबिया होता पण…”, ऐश्वर्या नारकर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाल्या,”हे त्या लोकांसाठी…”

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे (आयसीएमआर) माजी संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्या ‘गोइंग व्हायरल’ या पुस्तकावर आधारित आहे. त्यामुळेच की काय दिग्दर्शकाच्या मांडणीवरही हा पुस्तकी प्रभाव जाणवतो. चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला इथपासून ‘आयसीएमआर’च्या संशोधकांमध्ये सुरू झालेली चर्चा, आपल्याकडे करोनाचा कितपत प्रभाव आहे याची चाचपणी, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणल्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक नसणे, पुरेशा सोई नसणे, पीपीई किट उपलब्ध नसणे अशा पूर्ण नकारात्मक परिस्थितीतून आत्मनिर्भर होण्यापर्यंत झालेली वाटचाल हा ढोबळमानाने घडत गेलेला प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. करोनाचा हा अवघड काळ अनेकांना आजही विसरता येणं शक्य नाही. अनेकांना तर त्या काळातील आठवणी, करोनाचा साधा उल्लेखही निराशाजनक वाटतो. अशा परिस्थितीत त्या काळात घडलेल्या भयंकर परिस्थितीच्या आठवणींनी ताण येणार नाही याचे भान राखत केवळ लसनिर्मितीचे प्रयत्न आणि त्या अनुषंगाने आलेल्या अडचणींवर प्रकाश टाकण्याचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा प्रयत्न नक्कीच दखल घेण्याजोगा आहे.

मुळात सरकारी संस्था आणि त्यांचा कारभार आला की साहजिकच सरकारची ध्येयधोरणं, त्याचा प्रभाव, त्या काळात घेतलेले निर्णय या सगळय़ा गोष्टींचा उल्लेख होणं स्वाभाविक आहे. बहुधा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या वेळी झालेली टीका लक्षात घेत इथे थेट पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाळण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयांची बाजू इथे एका कॅबिनेट सचिवाच्या माध्यमातून मांडण्यात आली असली तरी त्यातला प्रचारकीपणा किंवा दिग्दर्शकाची वैयक्तिक समर्थक भूमिका लपवता आलेली नाही. त्याचा प्रभाव हा चित्रपटाच्या एकंदरीत मांडणीवर पडला आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी लसनिर्मितीची आव्हानं, शास्त्रज्ञांचे विचार, त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका हे सगळं अलिप्तपणे पाहता येत नाही. ते चित्रण एकांगी होते. आयसीएमआर आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) संशोधक, डॉक्टर्स यांचे एकत्रित प्रयत्न, एकमेकांमधील मतभेद, शासकीय लालफितीच्या कारभारात न अडकता वेगाने लसनिर्मिती होण्यासाठी केलेली खटपट, या प्रक्रियेत दिवसरात्र गुंतलेल्यांचे पणाला लागलेले वैयक्तिक आयुष्य हा सगळा भाग समजून घेण्यासारखा आहे. त्यामुळेच हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो. मात्र यातला फार मोठा भाग हा माध्यमांनी कशा पद्धतीने यात राजकारण केले आणि त्याकडे दुर्लक्ष करत सरकारने कशा पद्धतीने लसनिर्मितीचे आव्हान पूर्ण केले हे मांडण्यात गेला आहे. अगदी शेवटपर्यंत चित्रपट या विषयावर भाष्य करण्याची संधी सोडत नाही. पावणेतीन तास कालावधी असलेल्या या चित्रपटात लसनिर्मितीमागे नेमका कशा पद्धतीने विचार केला गेला या तपशिलात जाण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. अनेकदा डॉ. बलराम, डॉ. प्रिया अब्राहम, डॉ. निवेदिता गुप्ता, डॉ. रमण गंगाखेडकर या महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांची टेबलावरची चर्चा, वादविवाद इथेच आपण अडकून पडतो.

कथा आणि मांडणीतील हे कच्चे दुवे कसलेल्या कलाकारांच्या अभिनयामुळे काही प्रमाणात सांधले गेले आहेत. डॉ. बलराम यांची भूमिका अभिनेते नाना पाटेकर यांनी केली आहे. नानांना खूप मोठय़ा कालावधीनंतर चित्रपटात तेही चरित्र व्यक्तिरेखा साकारताना पाहणं ही पर्वणी आहे. या चित्रपटातील प्रत्येक स्त्री व्यक्तिरेखा त्या त्या अभिनेत्रीने उत्तम निभावली आहे. डॉ. प्रिया यांच्या भूमिकेसाठी पल्लवी जोशी यांनी पकडलेला हेल, देहबोली अप्रतिम आहे. आई म्हणून असलेली जबाबदारी आणि शास्त्रज्ञ म्हणून असलेलं देशाप्रति कर्तव्य या द्वंद्वात अडकलेल्या डॉ. निवेदिता यांच्या मनातील आंदोलनं आणि तरीही आपल्या विचारांवर ठाम राहणं, त्यांचा करारीपणा या छटा अभिनेत्री गिरिजा ओकने खूप सहज सुंदर पद्धतीने रंगवल्या आहेत. निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा या सगळय़ाच कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे केल्या आहेत. एक वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा विषय इतर कुठल्याही नाटय़ाचा, कुठल्याही एका बाजूचा मुलामा न देता हे देशी लसनिर्मितीचं युद्ध मांडलं असतं तर ते अधिक प्रभावी ठरलं असतं.

‘द व्हॅक्सिन वॉर’

दिग्दर्शक – विवेक अग्निहोत्री

कलाकार – नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा आणि अनुपम खेर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An interesting story trapped in a sardonic setting the vaccine war ysh

First published on: 01-10-2023 at 03:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×