संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘शेकी’ या गाण्यांनी जगभरात धुमाकूळ घातल्यावर सध्या या प्रसिद्ध गायकाचं ‘सुंदरी-सुंदरी तुझं नाव काय हाय…’ हे गाणं सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होत आहे. गेल्या काही दिवसांत मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी ‘सुंदरी’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण संजूच्या गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवत आहेत.

मराठी मालिकाविश्वातील दोन लोकप्रिय कलाकारांनी नुकताच संजू राठोडच्या ‘सुंदरी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अवघ्या काही तासातच नेटकऱ्यांनी लाइक अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ही जोडी यापूर्वीही एका लोकप्रिय मालिकेत एकत्र झळकली होती. हे दोन लोकप्रिय कलाकार म्हणजेच अमृता देशमुख व सिद्धार्थ खिरीड.

अमृता देशमुख व सिद्धार्थ खिरीड यांनी यापूर्वी ‘फेशर्स’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. ही मालिका तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. अमृता व सिद्धार्थ यांची ‘फ्रेशर्स’ मैत्री आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी एका नेपाळी गाण्यावर ठेका धरला होता. आता अमृता व सिद्धार्थ संजू राठोडच्या ‘सुंदरी’ गाण्यावर थिरकले आहेत.

‘सुंदरी’ गाणं गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमृता हा व्हिडीओ शेअर करत म्हणते, “हा ट्रेंड थोडा उशिरा फॉलो करणाऱ्या या दोन सुंदरी” नेटकऱ्यांनी या व्हिडीओ कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“अरे परी आणि निरव”, “फ्रेशर्सचं खरं रियुनियन”, “सिद्धार्थ अमृता कमाल…फ्रेशर्सचं Reunion झालं”, “खरंच एकदा फ्रेशर्सच्या संपूर्ण टीमचं रियुनियन करा” अशा कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अमृता देशमुख सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तिने यामध्ये साकारलेली सईची भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. तर, सिद्धार्थ खिरीड सध्या ‘मुरांबा’ मालिकेत झळकत आहे. ‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलेलं आहे.