Bigg Boss 19 Double Elimination : तीन आठवड्यांनी’बिग बॉस १९’ सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत. अखेर तीन आठवड्यांनी पहिल्यांदाच घरात एलिमिनेशन झालं आहे. या वीकेंडला एक नाही तर दोन सदस्य घराबाहेर गेले. कोण आहेत आहे दोन सदस्य? ज्यांचा प्रवास तीन आठवड्यांनी संपला, ते जाणून घेऊयात.
‘बिग बॉस १९’ च्या या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ मध्ये होस्ट सलमान खान नव्हता. दोन आठवडे सलमान खानने अनेक स्पर्धकांना त्यांच्या वर्तणुकीबद्दल फटकारलं होतं, या आठवड्यात फराह खानवर ‘वीकेंड का वार’ ची जबाबदारी होती. सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लडाखमध्ये होता, म्हणून फराह खानने दोन दिवस शो होस्ट केला. फराहबरोबर अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही आले होते.
शनिवारी ‘बिग बॉस १९’ च्या घरातून कोणालाही बाहेर काढण्यात आलं नाही, परंतु रविवारी दोन स्पर्धकांना एलिमिनेट करण्यात आलं. या आठवड्यात बिग बॉस १९ च्या घरातील आवेज दरबार, नगमा मिरजकर, नतालिया आणि मृदुल तिवारी हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते. रविवारी ‘वीकेंड का वार’ मध्ये नतालियाला सर्वात घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर होस्ट फराह खानने डबल इव्हिक्शन असल्याचं सांगितलं. तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर पडणारी स्पर्धक नगमा मिरजकर ठरली.
फराह खान नगमाबद्दल काय म्हणाली?
फराह खानने नगमा मिरजकरच्या एव्हिक्शनमागचं कारणही सांगितलं. “या तीन आठवड्यात तुम्हाला किती वेळा सांगितलं की घरात अॅक्टिव्ह व्हा, हा सर्वांसाठी एक वेक अप कॉल होता. तुमचे बाहेर किती चाहते आणि फॉलोअर्स आहेत, हे महत्त्वाचं नाही. जर तुम्ही घरात अॅक्टिव्ह नसाल तर तुम्हाला मतं मिळणार नाहीत,” असं फराह खान म्हणाली.
गर्लफ्रेंड नगमा एलिमिनेट झाल्यावर आवेजची प्रतिक्रिया
नगमा मिरजकर एलिमिनेट झाल्यावर आवेज दरबार म्हणाला, “ती खूप स्ट्राँग आहे, मी तिच्याकडून बरंच काही शिकलो आहे. सोशल मीडिया म्हणजे काय हे मला माहित नव्हतं, ते मी तिच्याकडून शिकलो. मी फक्त डान्समध्ये व्यग्र असायचो. ती मजबूत आणि टॅलेंटेड आहे, पण ती दोन आठवड्यांपासून आजारी होती, म्हणूनच ती अॅक्टिव्ह नव्हती.” निघताना नगमा आवेजला म्हणाली, “मी नसले तरी तू गेम नीट खेळ. मी बाहेर लग्नाची तयारी करते.”
दुसरीकडे नतालिया एलिमिनेट झाल्याने मृदुल तिवारीला वाईट वाटलं. त्याने अशनूर कौरच्या मदतीने नतालियाशी संवाद साधला. नतालिया घरातील पहिली मैत्रीण होती, पण तिला माझ्यामुळे जावं लागतंय, त्यासाठी सॉरी, असं मृदुल म्हणाला.