Bigg Boss 19 Pranit More : ‘बिग बॉस १९’ मध्ये सध्या प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात टोकाचे वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. घरातील सदस्य आता दोन टीम्समध्ये विभागले गेले आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात बसीर अलीने आवेज दरबार आणि नगमा यांच्या रिलेशनशिपबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. तर, याआधी बसीरने भांडणादरम्यान प्रणितवर देखील अतिशय चुकीच्या शब्दांत टीका केली होती.

यामुळे सध्या प्रणित मोरेच्या चाहत्यांमध्ये बसीर विरोधात संतापाची लाट उसळली आहे. प्रणित पहिल्या दिवसापासून आपल्या गेमवर लक्ष देऊन शांतपणे खेळ खेळत होता. पण, नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अमाल मलिक आणि बसीर अली यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन त्याच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळालं. तू फ्लॉप कॉमेडियन आहेस, तू कुरूप आहेस अशा चुकीच्या कमेंट्स बसीर प्रणितवर करत होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बसीरने कुरूप म्हटल्यावर प्रणित अतिशय संयमाने म्हणतो, “हो ठिके मी कुरूप आहे. पण मन चांगलंय माझं…” हा व्हिडीओ निक्की तांबोळीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत प्रणितच्या समर्थनात पोस्ट शेअर केली आहे.

निक्की म्हणते, “या अशाप्रकारच्या कमेंट्स ऐकणं किती लाजिरवाणं आहे. एखाद्याच्या दिसण्यावर किंवा त्याच्या रंगावर कमेंट करणं हे अतिशय वाईट आहे. प्रणित मोरे…संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील लोक तुझ्या पाठिशी आहेत. प्रेक्षकहो! हा आपला मराठी माणूस आहे प्लीज त्याला सपोर्ट करा. प्रणित आम्हाला सर्वांना तुझा अभिमान आहे. तू एकटा या सगळ्यांना समोरा जा आम्ही आहोत. Shame On You Baseer”

निक्की तांबोळीची पोस्ट

निक्की तांबोळीप्रमाणे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिनेता अभिजीत केळकर यांनी देखील प्रणितला पाठिंबा दिला आहे. आपल्या मराठमोळ्या प्रणितला जास्तीत जास्त लोकांनी व्होट करा आणि त्याला सपोर्ट करा असं आवाहन महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या सेलिब्रिटींनी केलं आहे.