‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी घराघरांत लोकप्रिय झाली. तिने या मालिकेत गोपी बहु हे पात्र साकारलं होतं. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेली एक एक्स पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये देवोलीनाने तिचा मित्र अमरनाथ घोष याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं सांगितलं आहे. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली. हा देवोलिनाचा जवळचा मित्र असल्याने याप्रकरणी पंतप्रधान मोदी व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लक्ष घालावं अशी विनंती तिने या पोस्टद्वारे केली आहे.

देवोलीना या पोस्टमध्ये लिहिते, “माझा मित्र अमरनाथ घोष यांची मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकादमी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या आईचं ३ वर्षांपूर्वी निधन झालं असून, वडिलांचं छत्र बालपणीच हरपल्यामुळे तो त्याच्या कुटुंबात एकटाच होता. एवढी मोठा घटना घडूनही अद्याप त्याच्या आरोपींबाबत काहीच समजलेलं नाही. याशिवाय सद्यस्थितीत त्याच्या कुटुंबात आम्हा मित्रांशिवाय इतर कोणीही नाही. तो मूळ कोलकाता येथील रहिवासी होता.”

हेही वाचा : जामनगरमध्ये रिहानाची ‘ती’ कृती पाहून सगळेच भारावले, गायिकेबद्दल नेटकरी म्हणाले, “बॉलीवूड सेलिब्रिटींनी हिच्याकडून…”

देवोलीना पुढे लिहिते, “अमरनाथ उत्तम डान्सर होता आणि त्याठिकाणी तो पीएचडीचं शिक्षण पूर्ण करत होता. संध्याकाळी बाहेर फिरायला गेल्यावर एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सध्या अमेरिकेतील काही मित्र त्याचा मृतदेह भारतात परत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.”

हेही वाचा : “प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत म्हणाले, “स्त्रियांना…”

“भारतीय दूतावासाने याप्रकरणी लक्ष द्यावे निदान आम्हा सगळ्यांना या हत्येमागचं कारण तरी समजलं पाहिजे.” असं देवोलीनाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच अभिनेत्रीने यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना टॅग करत मदतीची मागणी केली आहे.