दिल्ली-एनसीआर परिसरात गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले होते. कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालयाने सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडा आणि प्राणी निवारा केंद्रात ठेवा असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने भटक्या कुत्र्यांविरोधात हा मोठा निर्णय घेतल्यावर श्वानप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये देखील या निर्णयाबाबत नाराजीचा सूर उमटला आहे. याशिवाय मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका केतकी माटेगावकरने व्हिडीओ शेअर करत या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना केतकीला अश्रू अनावर झाले होते.

केतकी म्हणते, “एका श्वानाची आई ( Dog Mother ) या नात्याने मी सांगतेय, जे काही सुरूये ते अत्यंत क्रूर आहे. आता काहीजण माझ्या या वक्तव्याशी असहमत असतील, तो तुमचा निर्णय आहे. पण, सध्या जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत आणि ज्या पद्धतीने कुत्र्यांना पकडून ट्रकमध्ये फेकलं वगैरे जातंय ते खरंच वेदनादायी आहे. अशाप्रकारे जेव्हा माणसांना त्रास दिला जाईल, जसं एकेकाळी हिटलरने सर्वांना त्रास दिला होता तसा त्रास कोणी माणसांना दिला तर चालेल का? तुम्ही म्हणताय की आम्ही लसीकरण करू…तुम्ही ते सगळं करा पण, प्लीज ते दाखवा.”

अभिनेत्री पुढे म्हणते, “तुम्हाला काय वाटतं, कुत्र्याच्या अंगावर भरपूर केस असतात कारण ते सतत बाहेर असतात. त्यांचं संरक्षण व्हावं यामुळे त्यांची रचना तशीच करण्यात आली आहे. कुत्र्यांना फक्त घरात ठेवायचं असतं तर कदाचित त्यांची रचना तशी नसती. त्यामुळे ते बाहेर राहू शकतात. आपण कुत्र्यांना आपल्यासाठी घरात आणतो. आपण ‘I Like Pet’ असं म्हणत त्यांना जवळ करतो. माझ्याकडे सुद्धा Dog आहे, मी श्वानप्रेमी आहे म्हणून त्याला घरी आणलं. पण, त्याला सतत बाहेर जायचं असतं. तो जेव्हा इतर श्वानांना भेटतो तेव्हा प्रचंड खूश होतो. मला मान्य आहे की, रेबिजसारखे आजार आणि सुरक्षा म्हणून हा निर्णय घेतला असेल पण, या गोष्टीला काहीतरी बॅलन्स असला पाहिजे.”

“एवढ्या सगळ्या श्वानांना पकडून तुम्ही सेफ शेल्टर होममध्ये ठेवणार आहात ना? मग कुठेय ते शेल्टर? आम्हाला ते बघायला मिळेल का? जिथे सुंदर जागा असावी, ते मोकळेपणाने वावरू शकतील. फक्त असं बंदिस्त सगळं नसावं. त्यांची काळजी घेण्यासाठी तिथे चांगली माणसं असावीत. आतापर्यंत समोर आलेलं जे काही फुटेज मी पाहतेय. ज्या पद्धतीने या भटक्या कुत्र्यांना नेलं जातंय, त्यांना पोत्यात वगैरे बांधून नेत आहेत…असं सगळं न करता त्यांच्याशी जरा प्रेमाने तरी वागा इतकंच माझं म्हणणं आहे.” असं केतकीने स्पष्ट केलं आहे.

https://images.loksattaimg.com/2025/08/ketaki.mp4
केतकी माटेगावकरची पोस्ट

यापुढील पोस्टमध्ये केतकीने भटक्या कुत्र्यांना कशाप्रकारे पोत्यात भरून पकडलं जातंय, याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. दरम्यान, केतकीप्रमाणे, जॉन अब्राहम, जान्हवी कपूर, वरुण धवन आणि वीर दास या कलाकारांनी देखील या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे.