Smriti Irani Talks About Shah Rukh Khan : स्मृती इराणी या एकेकाळी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा होत्या. अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर त्या काही काळ अभिनयापासून दूर राहिल्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक केलं.

स्मृती इराणी यांनी त्यांच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेच्या दुसऱ्या भागातून पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. सध्या त्या या मालिकेतून तुलसीच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अशातच आता त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सलमान खानबद्दलही सांगितलं आहे.

शाहरुख खानने स्मृती इराणींना दिलेला सल्ला

स्मृती यांनी नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांनी सलमान व शाहरुखबद्दल सांगितलं. स्मृती यांचे पती शाहरुख व सलमानचे मित्र होते याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. यासह त्यांनी शाहरुख खानने त्यांना लग्न न करण्याचा सल्ला दिला होता याबद्दलही सांगितलं आहे. यामध्ये त्या शाहरुख खानबरोबरच्या भेटीचा किस्सा सांगत म्हणाल्या, “शाहरुख खान माझ्या पतीला (जुबीन इराणी) ओळखायचा. शाहरुख खानला भेटल्यानंतर त्याने मला आधी हेच सांगितलं की लग्न करू नकोस. तो म्हणाला, मी आताच सांगतोय तुला लग्न करू नकोस. तेव्हा मी म्हटलं खूप उशीर नाही झाला आता हे सांगायला? कारण तेव्हा माझं लग्न झालेलं.”

सलमानबद्दल स्मृती पुढे म्हणाल्या, “सलमान आणि जुबीन एकाच शाळेत होते, त्यामुळे जेव्हा जुबीनने सलीम काकांबरोबर माझी ओळख करून दिली तेव्हा ते मला म्हणाले, तुला माहितीये का तुझे पती माझ्या मुलाबरोबर काय करायचे. माझी गाडी चोरून पळून जायचा तो. त्यावेळी सलमान खान आणि जुबीन दोघे खाली मान घालून उभे होते आणि सलीम काका त्यांना दोघेही काही कामाचे नाहीत असं म्हणाले.”

स्मृती इराणी यांनी २००१ साली लग्न केलं होतं. त्यांचे पती जुबीन इराणी हे एक उद्योजक आहेत. या जोडीला एक मुलगा व मुलगी अशी दोन मुलं आहेत. स्मृती या जुबीन यांच्या दुसऱ्या पत्नी असून त्यांच्याआधी जुबीन यांचं मोना इराणींशी लग्न झालेलं आणि त्या दोघांनाही एक मुलगी आहे.