Actress Rasika Dhamankar New Home : आई अन् लेकीचं नातं कायम खास असतं. आपल्या आईची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत, आपल्या आईच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशी इच्छा प्रत्येक मुलीची असते. सध्या मराठी कलाविश्वातील अशाच एका मायलेकीच्या जोडीची सर्वत्र चर्चा होत आहे. यामागचं कारणही खूपच खास आहे…ते म्हणजे लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या लेकीने आपल्या आईला तिच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त नव्या घराच्या रुपात खास गिफ्ट दिलं आहे.
आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. लोकप्रिय अभिनेत्री रसिका धामणकर यांच्या लेकीने सुद्धा स्वत:च्या हक्काच्या घराचं स्वप्न काही वर्षांपूर्वी पाहिलं होतं. अंतराचं हे स्वप्न वयाच्या २८ व्या वर्षी पूर्ण झालं आहे. तिने लाडक्या आईला नवीन घर भेट म्हणून दिलं आहे. रसिका धामणकर व त्यांच्या कुटुंबाने या नव्या घरात नुकताच गृहप्रवेश केला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीच्या लेकीने इन्स्टाग्रामवर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
लेकीने आईसाठी घेतलं नवीन घर
रसिका धामणकर यांची लेक अंतरा लिहिते, “आमचं घर माझ्या बाबांची मेहनत, परिश्रम आणि माझ्या आईच्या प्रेमाने एकत्र बांधलं गेलं आहे. लहापणापासून मी एक स्वप्न पाहिलं होतं, ते म्हणजे माझं हक्काचं, स्वत:चं नाव असलेलं सुंदर घर असावं. मुंबई मैं अपना घर…मी स्वत:च्या मनाशी निश्चय केला होता, जेव्हा मी पहिलं घर घेईन ते माझ्या आईचं असेल. ते घर माझ्या आईसाठी असेल, मी तिला गिफ्ट देईन. वयाच्या २८ व्या वर्षी ते स्वप्न खरं झालं. २०२५ या वर्षात माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले…माझ्या आई-बाबांच्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झालं आहे. ‘आई के लिए एक नया घर… मेरी मेहनत और सबर का फल.’ आणखी एक सत्य सत्यात उतरलं…हे तुझ्यासाठी आहे आई…आय लव्ह यू आई.”
सध्या संपूर्ण कलाविश्वातून रसिका धामणकर व त्यांची मुलगी अंतरावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “हा खूपच भावनिक क्षण आहे…तुम्हा मायलेकीचं नातं असंच फुलत राहो” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, रसिका धामणकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नाची बेडी’ या मालिकेतून त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. याशिवाय काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.