बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना जो त्रास दिला गेला, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य लोक, राजकीय नेते आणि आता कलाकारही याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी व अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पोस्ट केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. “न्यूज चॅनल वरील संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे फोटो पाहून अस्वस्थ व्हायला होतं. विकृतीची परिसीमा आहे ही…महाराष्ट्र असा नव्हता..दुःखद..,” असं सचिन गोस्वामी यांनी लिहिलं आहे.

सचिन गोस्वामी यांची पोस्ट (सौजन्य – फेसबुक)

पृथ्वीक प्रतापची पोस्ट

संतोष देशमुखांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी पृथ्वीक प्रतापने केली आहे.

“मन सुन्न करणारे,
मन हेलावून टाकणारे संतापजनक फोटो…
संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा,” अशी पोस्ट पृथ्वीक प्रतापने इन्स्टाग्रामवर केली आहे.

पृथ्वीक प्रतापची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

९ डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या विकृतीचे फोटो समोर आले आहेत. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना आरोपींनी मारहाण केल्याचे फोटो व व्हिडीओ आहेत. या प्रकरणातील काही व्हिडीओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती. आरोपींनी देशमुखांना मारहाण केली, तसेच त्यांच्यावर लघुशंकाही केली होती. संतोष देशमुखांचा छळ करत असताना आरोपी हसत होते.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra sachin goswami prithvik pratap posts on santosh deshmukh murder hrc