‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेते मिलिंद गवळी यांची घराघरांत एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मालिका संपून आता वर्ष झालं असलं तरी आजही या सिरियलमधील प्रत्येक पात्राची लोकप्रियता घराघरांत कायम आहे. अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सध्या एका हिंदी मालिकेत काम करत आहेत.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट कायम चाहत्यांसाठी वाचनीय व लक्षवेधी ठरतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टद्वारे अंडरग्राऊंड मेट्रोप्रवास, दक्षिण मुंबईची सफर आणि नीता अंबानींच्या स्वदेश स्टोअरला दिलेली भेट याबद्दलचा अनुभव सांगितला आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट…

टीव्ही मालिकेत काम करत असताना सुट्टी केव्हा असेल, हे कलाकाराला माहीत नसतं. आदल्या रात्री कळतं उद्या शूटिंग नाहीये, मग तो दिवस असतो सुट्टीचा, कॉलेजमध्ये सुट्टीच्या दिवशी मी भटकंती करायचो. दिपाला म्हटलं, आज दिवसभर भटकंती करू, ती एका पायावर तयार झाली.
आरेकॉलनी ते कफपरेड अंडरग्राउंड मेट्रो सुरू झाली आहे माहीत होतं, JVLR आरेला गाडी पार्क केली, शेवटच्या कफपरेड स्टेशनपर्यंत रिटर्न तिकीट काढलं.

बरोबर एक तास लागतो पोहोचायला, ट्रेनमध्ये माझी मालिका पाहणारी ४ वर्षांच्या श्रीयानची आई भेटली आम्ही गप्पा मारल्या, तिला रविवारची सुट्टी म्हणून दादरला ‘प्रकाश’मध्ये पियुष आणि मिसळ खायला लेकाला घेऊन चालली होती. रविवारचं कफपरेड बंद असतं, तरी आम्ही थोडी भटकंती केली. मग जेवायला गिरगावला उतरलो, मरीनलाईनला आम्ही ‘संतोषम’ मध्ये गेलो, तिथे रविवारची प्रचंड गर्दी होती, फ्रान्सवरून तिकडे जेवायला काही मुलं-मुली आले होते, त्यांच्या गाईडचं नाव मिलिंदो होतं, विसलिंग वुड्सचा टीचर, त्याच्याशी छान गप्पा झाल्या.

तिथेच माझ्या कीर्ती कॉलेजची पायल तिचे मिस्टर विशाल सचदेव यांच्याबरोबर जेवायला आली होती, अनेक वर्षांनी एकमेकांना पाहिलं, ओळखलं, मग काय आम्ही चौघं छान गप्पा मारत एकत्र जेवलो, त्यांनीच आम्हाला चर्चगेटला सोडलं. समोरच नीता अंबानींचं स्वदेश स्टोअर होतं. आत शिरलो, आणि एक वेगळंच विश्व अनुभवायला मिळालं. तिथे हर्ष भेटला त्यांनी भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय शिल्पकला याबद्दल इतकी माहिती दिली की आम्ही दोघेही भारावूनच गेलो, तिथे काश्मिरी कारागीर गालीचा बनवत होते. कलमकारी शिल्पकला, भारतीय संस्कृती आणि कला जपणार हे सुंदर दालन बघून खूप छान वाटलं.

भारतभरातून आलेल्या अप्रतिम कलाकृती, मुर्त्या, चित्रकला, साड्या, क्रोकरीज, फर्निचर, बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. सामान्य माणसांच्या अवाक्या बाहेरच्या आहेत, पण हे दालन आणि अशा कलाकृती एकदा तरी पाहाव्यात अशा आहेत. आमचा वेळ कसा निघून गेला कळलंच नाही, संध्याकाळ झाली, पुन्हा चर्चगेटवरून मेट्रोत बसलो…. आरेला उतरलो, गाडी घेतली आणि जेवणाच्या वेळेत घरी पोहोचलो. असंख्य लोकांच्या भेटी, त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, अनेक वर्षानंतर मुंबईतलं शेवटचं टोक कफपरेड पुन्हा पाहिलं. माझं मुंबई शहर किती सुंदर आहे, या शहरातील माणसं किती छान आहेत, या शहरामध्ये भारतातले किती रंग आहेत, या शहरांमध्ये किती बघण्यासारखं अनुभवण्यासारखं आहे, खाण्यापिण्याच्या किती व्हरायटीज आहेत. छान Memories घेऊन मी आणि दिपा घरी पोहोचलो.

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘मनपसंद की शादी’ या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यामध्ये त्यांच्यासह अभिनेत्री सुचित्रा बांदेकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत.