रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर तब्बल १७ वर्षांनी आपलं नाव कोरलं आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र विराट कोहलीच्या आरसीबी टीमची चर्चा सुरू आहे. विराट-अनुष्काचे अनेक भावनिक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. विशेषत: किंग कोहलीच्या १७ वर्षांच्या संयमाचं विशेष कौतुक केलं जात आहे. RCB च्या विजयावर मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सुद्धा भावना व्यक्त केल्या आहे.

बॉलीवूडमधून विकी कौशल, रणवीर सिंह, सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय यांनी विराटसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. यासह मराठी कलाविश्वातील कलाकार सुद्धा RCB च्या विजयावर आनंद व्यक्त करत आहेत. पृथ्वीक प्रताप, क्षितीज पटवर्धन यांच्या पाठोपाठ मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने विराट कोहली व RCB टीमसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

‘बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व आणि विविध मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुचिरा जाधव विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. ती किंग कोहलीला प्रत्येक मॅचदरम्यान पाठिंबा देत असते. RCB ने तब्बल १७ वर्षांनी विजय मिळवल्यावर अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

रुचिरा जाधवची पोस्ट

हा खऱ्या अर्थाने जर्सी नंबर १८ चा विजय आहे…
निष्ठा, समर्पण, उत्साह, संयमाचा विजय…

१८ वर्षे एकही कप न जिंकता चाहत्यांच्या कायम मनात राहणं…दरवर्षी त्याच उत्साहाने टुर्नामेंटची सुरुवात करणं, तेवढ्याच आनंदाने मैदानावर पाऊल ठेवणं, लाखो चाहत्यांच्या शुभेच्छांचा भार खांद्यावर घेऊन सर्वोत्तम कामगिरी करणं…विराट खरंच तू किती भारी माणूस झाला आहेस…

“There is a one percent chance, and sometimes that chance is good enough” हे तुझे शब्द आम्हा चाहत्यांना कायम प्रेरणा देतात. आयुष्यात तू काय नेमका काय विचार करतोस याची जाणीव यादरम्यान आम्हा सर्वांन झाली. विराट तू खरंच सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेस…

सर्वात महत्त्वाचं म्हणजे…तुझं अनुष्कावर असलेलं प्रेम…तू ज्याप्रकारे अनुष्कावर प्रेम करतो तो एक सुंदर अन् स्वतंत्र अध्याय आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की, तू अमरेंद्र कोहली, विराट बाहुबली आहेस …आणि आता गेल्या काही दिवसांत अनुष्का आणि तुझं अध्यात्माशी वाढत जाणारं नातं पाहून…तुम्हा दोघांबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. तू फक्त क्रिकेटपटू नाहीस…सर्वांसाठी इमोशन आहेस आणि खरोखरच प्रत्येकासाठी आदर्श आहेस. थँक्यू विराट कोहली…

दरम्यान, रुचिरा जाधवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.