‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ८ मार्चला ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ हा सोहळा प्रसारित होणार आहे. या भव्य सोहळ्याचे प्रोमो पाहून सध्या प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. कारण, ‘झी गौरव’ पुरस्कारांचं हे २५ वं वर्ष आहे. मनोरंजनाचा हा सोहळा असंख्य जुन्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. यंदा या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयस तळपदेने या सोहळ्यात ‘झी मराठी’च्या सगळ्या नायिकांबरोबर परफॉर्म केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी चित्र गौरव’ या भव्य सोहळ्यात प्रेक्षकांची लाडकी ‘पारू’ ही एक परफॉर्मन्स सादर करणार आहे. या परफॉर्मन्सबद्दल बोलताना ‘पारू’ म्हणजेच शरयू सोनवणेने काही किस्से सांगितले. शरयू म्हणाली, “झी चित्र गौरव पुरस्काराचा हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. हे वर्ष झी चित्र गौरव पुरस्कारांचं २५ वं वर्ष आहे आणि मला परफॉर्म करण्याची संधी मिळणं… हा खूप मौल्यवान क्षण आहे. माझा पहिला परफॉर्मन्स आणि तो ही श्रेयस तळपदे सरांबरोबर मी खरंच खूप आनंदी आहे.”

शरयू पुढे म्हणाली, “श्रेयस सरांबद्दल मला नेहमीच आदर आहे. कारण, एवढी वर्षे मी त्यांचं काम बघत आले आहे. त्यांना पहिल्यांदा मंचावर पाहिलं तेव्हा थोडं दडपण आलं होतं. मी मालिकेच्या शूटनिमित्त साताऱ्यात होते. त्यामुळे इथे आल्यावर मी डायरेक्ट टेक्निकलसाठी कामकाजासाठी त्यांना भेटले. त्यानंतर लगेच आमचा परफॉर्मन्स होता. आता आमचा डान्स झाल्यावर श्रेयस सरांनी मला विचारलं. “शरयू सध्या काय करतेस, कसं चाललंय तुझं” मी त्यांना सांगितलं सर आता पारू मालिका करतेय. तेव्हा त्यांची रिएक्शन होती “ओ पारू…” त्यांना आमच्या मालिकेबद्दल आधीच माहिती होती. त्यांच्यापर्यंत ‘पारू’ मालिका पोहोचलीये हे प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकून खूप छान वाटलं. मला त्यांची एक गोष्ट इतकी भारी वाटली की, त्यांना माझं नाव एकदा सांगून लक्षात राहिलं आणि त्यांनी माझी विचारपूस सुद्धा केली.

“आम्हा सर्व नायिकांचा त्यांच्याबरोबर डान्स होता. त्यात बरीच मराठी गाणी होती. म्हणजे १९५० पासूनची गाणी आणि त्यात मी आणि श्रेयस सरांनी “ऐरणीच्या देवा तुला…” या माझ्या आवडत्या गाण्यावर परफॉर्म केलं. त्यामुळे हा क्षण, अनुभव माझ्या कायम लक्षात राहणार आहे.” असं शरयू सोनावणेने सांगितलं.

दरम्यान, ‘झी मराठी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा येत्या ८ मार्चला सायंकाळी सात वाजता टिव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया व सचिन पिळगांवकर, शुभांगी गोखले, महेश मांजरेकर, भरत जाधव, महेश कोठारे ही दिग्गज मंडळी या सोहळ्याला यंदा उपस्थित होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame actress sharayu sonawane shares working experience with shreyas talpade sva 00