Prajakta Mali on Maharashtrachi Hasyajatra : सहजसुंदर अभिनय, मनमोहक सौंदर्य, दिलखेचक अदा अन् आपल्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे, प्राजक्ता माळी. छोटा पडदा असो वा मोठा पडदा, प्राजक्ताने कायमच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. लोकप्रिय मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून प्राजक्ताने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे.

तसंच प्राजक्ताने काही रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालनदेखील केलं आहे. यापैकीच एक शो म्हणजे, छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील विनोदी कलाकारांनी आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं आहे. या शोमुळे अनेक विनोदी कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कलाकारांची सोशल मीडियावर कायमच चर्चा होताना दिसते.

तसंच प्राजक्ता माळीचं सूत्रसंचालनही लक्ष वेधून घेतं. तिच्या ‘वाह दादा वाह’ या वाक्याचा तर मोठा चाहतावर्ग आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील सूत्रसंचालनाने अनेकांच्या पसंतीस उतरेलेल्या प्राजक्ताने मात्र सुरूवातीला या शोसाठी नकार दिला होता. तिने रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन करणारच नाही असं ठरवलं होतं, मात्र त्यानंतर तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोसाठी कसा होकार दिला, याबद्दल नुकतंच एका कार्यक्रमात सांगितलं आहे.

MHJ Unplugged या गप्पांच्या कार्यक्रमात प्राजक्ताने सूत्रसंचालनाला दिलेल्या होकाराबद्दल सांगितलं आहे. यावेळी प्राजक्ता म्हणाली, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधलं सूत्रसंचालन कदाचित माझ्या नशिबातच होतं. मला आव्हान म्हणून किंवा अनुभव म्हणून नवनवीन गोष्टी करून बघायला आवडतं. त्यामुळे मग एक सत्र करू आणि दुसऱ्या सत्रासाठी नकार देऊ असं ठरवलेलं. त्यामुळे मी तेवढंच करणार होते. पण मग दुसऱ्या सत्राला मला प्रसाद ओक म्हणाले, “तू दुसरं सत्रही कर हा… नाहीतर असं लोकांना वाटेल, तुला काढलं आहे. त्यामुळे दुसरं सत्र कर. हवं तर तिसरं सत्र करू नको.”

यापुढे प्राजक्ताने सांगितलं, “पुढे काहीना काही गोष्टी येत राहिल्या आणि शो चालू राहिला. नंतर लॉकडाऊनमध्ये तर फक्त हाच शो सुरू होता. त्यामुळे या सूत्रसंचालनकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला आहे. आता हे पुण्यकर्म झालं आहे. ‘तुझं काम आवडतं’, ‘तू किती गोड हसतेस’ आणि ‘किती छान दिसते’ या प्रतिक्रियांपेक्षा ‘तुला बघून आम्ही हसतो’. तुमच्या कार्यक्रमामुळे आम्हाला आनंद मिळतो. ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’ बघून आम्हाला छान झोप लागते. या प्रतिक्रिया मला मिळायला लागल्या. त्यामुळे मला जाणवलं की, हे पुण्यकर्म आहे. त्यामुळे आता याला गालबोट लागता कामा नये.”

प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे प्राजक्ता सांगते, “मला कधी कधी कंटाळा आलाय, असं वाटतं. कारण यात मला या शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी विविधता नाही. कारण मी पूर्णवेळ इतरांना अभिनय करताना बघत असते. मीसुद्धा एक कलाकार आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना बघून असं वाटतं की, आपण ही एकच गोष्ट करत आहोत. यात काही नावीन्य नाही. पण हा शोमुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद येत आहे. त्यामुळे याला गालबोट लागता कामा नये असं मला वाटलं.”