Raqesh Bapat’s Ex Wife Ridhi Dogra on love after divorce: टेलिव्हिजन, बॉलीवूडच्या जगातील काही कलाकारांच्या जोड्या लोकप्रिय ठरतात. त्यांचा चाहतावर्ग मोठा असतो. रिद्धी डोगरा व राकेश बापट हे अशाच जोडप्यांपैकी एक होते.

राकेश व रिद्धी ‘मर्यादा’ या मालिकेच्या सेटवर भेटले, त्यांच्यात मैत्री झाली, ते प्रेमात पडले आणि २९ मे २०११ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या आठ वर्षांनंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांनी एकमेकांच्या संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या घटस्फोटाने अनेक चाहत्यांना धक्का बसला होता.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिद्धी डोगराने राकेश बापटबरोबरच्या घटस्फोटाबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी एकमताने घटस्फोटाचा निर्णय घेतला असला तरी अचानक आलेल्या एकाकीपणाबरोबर जुळवून घेण्यासाठी वेळ लागला असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

“मी पुन्हा प्रेमात पडण्यास…:

रिद्धी डोगराने नुकतीच इन्स्टंट बॉलीवूडला मुलाखत दिली. या मुलाखतीत घटस्फोटानंतर तिच्यामध्ये काय भावनिक बदल झाले याबद्दल सांगितले. एक विवाहित स्त्री, जिला एका आनंदी कुटुंबात राहण्याची सवय होती, ती एकटी राहायला लागते आणि हळूहळू स्वत:बरोबर एक उत्तम नाते तयार करते. स्वत:ला पुन्हा ओळखायला लागते. या सगळ्याचा तिचे जे आज व्यक्तिमत्त्व आहे, त्यावर मोठा प्रभाव असल्याचे रिद्धी म्हणाली.

रिद्धी म्हणाली, “माझ्यासाठी राकेश माझं घर होता. घटस्फोटानंतर मला त्याच्या सहवासाची उणीव भासत होती, पण कालांतराने मला माझ्या एकटेपणाची सवय झाली. आता मी स्वत:च्याच सहवासात आनंदी असते.”

तू पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहेस का? या प्रश्नावर रिद्धी म्हणाली, “प्रेमात पडू नये असे कोणाला वाटते? मी पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे. मी खूप रोमँटिक आहे. प्रेमात पडायला मला थोडा वेळ लागतो, पण मला निवडक माणसं, गोष्टी आवडतात.”

प्रेमात तिने काय वेडेपणा केला होता? यावर रिद्धी म्हणाली, “स्वत:चा, माझ्या आत्मसन्मानाचा विचार न करता मी खूप प्रेम केले आहे. मला वाटते की हा वेडेपणा मी केला आहे. हा वेडेपणा कोणीही करू नये. कारण तो तुमचा पडता काळ असतो, अनेक जण यालाच प्रेम म्हणतात, पण हे प्रेम नाही.”

“जे लोक प्रेमात स्वत:चा आत्मसन्मान बाजूला ठेवतात, स्वत:ची किंमत करत नाहीत, हळहळू त्यांची ओळख पुसट होते. प्रेमात जे लोक असा वेडेपणा करतात, शेवटी त्यांच्याकडे एकच प्रश्न उरतो की मी कोण आहे.”

राकेश बापटने रिद्धी डोगरासाठी केलेली ‘ही’ रोमँटिक गोष्ट

या मुलाखतीत तिला विचारले की, आतापर्यंत तुझ्यासाठी कोणीतरी रोमँटिक गोष्ट केली असेल तर ती कोणती आहे? यावर रिद्धी म्हणाली, “माझ्या एक्स पतीने माझे पेंटिंग बनवले होते. सध्या ते पेंटिंग माझ्याजवळ नाही.

राकेशपासून वेगळे झाल्यानंतर रिद्धीने तिच्या खासगी आयुष्याबाबत सार्वजनिक ठिकाणी कुठेही वक्तव्य केले नाही. तिचे नाव इतर कोणाशीही जोडले गेले नाही; तर राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार २०२२ मध्ये ते वेगळे झाले.

रिद्धीच्या कामाबाबत बोलायचे तर तिने सलमान खान, शाहरुख खान यांच्याबरोबर टायगर ३ आणि जवान अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. याबरोबरच, काही वेब सीरिजमध्येदेखील ती दिसली आहे.

राकेश बापट नुकताच नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच गाजली. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता आगामी काळात तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.