छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळेला ओळखलं जातं. ‘सांग तू आहेस का?’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघी’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम करून तिने आपल्या अभिनयाची छाप सर्वत्र उमटवली आहे. शिवानीने आतापर्यंत अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेत्री ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका झी मराठीवर गेली दीड वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. यामध्ये शिवानी रांगोळेने अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारली आहे. अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच चांगला प्रतिसाद दिला. मालिकेत अधिपती प्रेमाने अक्षराला मास्तरीण बाई अशी हाक मारतो. त्यामुळेच शिवानीला मास्तरीण बाई अशी घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली आहे.
शिवानीची ‘फादर्स डे’ निमित्त नुकतीच ‘झी मराठी’ वाहिनीवर लहानशी मुलाखत घेण्यात आली. ‘फादर्स डे’ निमित्त विचारण्यात आलेल्या प्रश्नांना शिवानी रांगोळेने दिलखुलास उत्तरं दिली आहेत. “तू वडिलांना कोणत्या नावाने हाक मारतेस?” यावर शिवानी म्हणाली, “मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारते” पुढे अभिनेत्रीला “तुझे वडील तुला कोणत्या नावाने हाक मारतात?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना शिवानीने एक हटके खुलासा केला आहे.
शिवानी सांगते, “माझे पप्पा मला शिवानीचं नावाने हाक मारतात. पण, त्यांनी माझं नाव ‘अनुप्रिता’ ठेवलेलं आहे. त्यांची खूप इच्छा होती की, मी ‘अनुप्रिता’ हेच नाव वापरावं. पण, माझ्या आईला ‘शिवानी’ हे नाव खूप आवडलं.” तसेच कुटुंबीयांबद्दल सांगताना अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी, आई आणि पप्पा आम्ही तिघं मिळून खूप फिरलोय. बाबांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मी जर्मन भाषा शिकले. ते मला खूप फायद्याचं ठरलं.”
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, सध्या या मालिकेत अक्षरा-अधिपतीमध्ये प्रेमाचं नातं बहरत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अक्षराने अधिपतीसमोर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. परंतु, भुवनेश्वरी या दोघांना वेगळं करण्यासाठी आता नवीन कारस्थान रचणार आहे. आता मालिकेत पुढे काय काय रंजक वळणं येणार हे आपल्याला आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल.
