Star Pravah New Serial Starring Madhurani Prabhulkar & Dr. Amol Kolhe : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरांत लोकप्रिय झाली. टेलिव्हिजनवर या मालिकेने जवळपास ५ वर्षे अधिराज्य गाजवलं. यामध्ये मधुराणीने साकारलेली ‘अरुंधती’ ही भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली होती. मालिका संपल्यावर अभिनेत्रीचे चाहते तिला प्रचंड मिस करत होते. मधुराणी पुन्हा छोट्या पडद्यावर केव्हा कमबॅक करणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आता आलेला आहे. मधुराणीची मुख्य भूमिका असलेली नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तिच्यासह ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मधुराणी आणि अमोल कोल्हे यांच्या नव्या मालिकेचं नाव आहे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’.
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेचा लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला. गेल्या काही दिवसांपासून १८ नोव्हेंबरला सर्वात मोठी बातमी कळणार या आशयाचे पोस्टर ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आले होते. १८ तारखेला नेमकं काय घडणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर याचा उलगडा झालेला आहे. मालिकेच्या लॉन्चिंग सोहळ्यातील व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, आता ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका केव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अरुंधतीचं कमबॅक होत असल्याचं समजल्यावर आता मधुराणीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
