Suraj Chavan New Home Gruh Pravesh Video: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता व रीलस्टार सूरज चव्हाणने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. सूरज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, त्यापूर्वी तो त्याच्या नवीन घरात राहायला आला आहे. सूरज चव्हाणने गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करून त्याच्या नवीन घराची झलक दाखवली.

सूरज चव्हाण हा मूळचा बारामती तालुक्यातील मोढवे या गावातला आहे. सूरज रीलस्टार म्हणून लोकप्रिय झाला, पण त्याला राहायला घर नव्हतं. तो बिग बॉस मराठीमध्ये असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याला घर बांधून देणार असं म्हटलं होतं. आता वर्षभरात त्याचं नवीन घर तयार झालं असून सूरजने बहिणींबरोबर या घरात गृहप्रवेश केला आहे.

सूरज चव्हाणने शेअर केलेल्या व्हिडीओत प्रशस्त हॉल पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मॉड्युलर किचन, प्रशस्त खोल्या दिसत आहेत. घराचं इंटिरियर खूपच सुंदर केलं आहे. एकूणच सूरजचं हे घर म्हणजे आलिशान बंगला आहे. सूरज चव्हाणने “आज केला माझ्या नवीन घराचा गृहप्रवेश” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सुरज चव्हाणच्या घराचा व्हिडीओ-

सूरज चव्हाणच्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नवीन घरासाठी त्याचं अभिनंदन केलं आहे. ‘आज एक गरीब मुलगा जिंकला… अभिनंदन भावा,’ शून्यातून विश्व निर्माण केलं, सूरज भाऊ अभिनंदन,’ एका छोट्याश्या घरातून सुरू झालेला तुझा प्रवास ‘आज तुझ्या हक्काच्या वास्तूत गृहप्रवेश होतोय सूरज, तुझ्यासाठी खरंच खूप आनंद आहे, आई मरीमातेच्या आशिर्वादाने, तुझ्या कष्टाने, अजित दादांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सोबतीने हे घडलंय…तुझी कायम प्रगती होत राहो…बाकी देवाक काळजी, अभिनंदन मित्रा’, ‘यावरून कळते की नशिबात लिहिलेले कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही’, अशा कमेंट्स सूरज चव्हाणच्या व्हिडिओवर आहेत.

सूरज चव्हाणचं लग्न

सूरज चव्हाण काही दिवसांनी लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव संजना आहे. सूरज व संजना २९ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत. २८ नोव्हेंबरपासून त्याच्या लग्नविधींना सुरुवात होईल. जेजुरीजवळील सासवड याठिकाणी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. दोन्ही कुटुंबीय सध्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत.