Tejaswini Pandit Mother Actress Jyoti Chandekar Passed Away : तेजस्विनी पंडितची आई आणि प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं होतं. गेल्या अडीच वर्षांपासून ज्योती चांदेकर महाराष्ट्राची नंबर वन मालिका म्हणून ओळख निर्माण झालेल्या ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांनी साकारलेल्या पूर्णा आजीच्या भूमिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यांच्या निधनानंतर मालिकेतील कलाकार व चाहत्यांना सुद्धा धक्का बसला आहे.

आईच्या निधनानंतर तेजस्विनीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. “कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी आज १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झालं आहे. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नवी पेठ वैकुंश स्मशानभूमी, पुणे याठिकाणी करण्यात येतील.”

तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट ( Tejaswini Pandit Mother Actress Jyoti Chandekar Passed Away )

दरम्यान, ज्योती चांदेकर यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमासह त्यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण साकारल्या आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.