Vidisha Mhaskar Post On Thane Ghodbandar Road : मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना घडत आहेत. दुरवस्थेमुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे-घोडबंदर हा रस्ता चर्चेत आहे. ठाणे-घोडबंदर रोडची स्थिती इतकी वाईट आहे की, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकच नव्हे तर अनेक सेलिब्रिटीसुद्धा वैतागले आहेत.
ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांबाबत अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री विदिशा म्हसकरने एक व्हिडीओ शेअर करीत याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत घोडबंदर रोडवर एका जोडप्याचा अपघात झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
विदिशा म्हसकरने व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “देवाने मला पृथ्वीवर चांगला वेळ घालवायला पाठवलं. पण मी घोडबंदर येथे वाहतूक कोंडीत अडकलेय. हे अत्यंत लाजिरवाणं आहे. आपण कर का भरतोय? आम्हाला काही महागड्या गोष्टी नको आहेत. ही एक मूलभूत आणि महत्त्वाची गरज आहे.”
विदिशाने पुढे नितीन गडकरी, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत लिहिलं, “आम्हाला दररोज हा त्रास सहन करतोय, कृपया याकडे लक्ष द्या.”
दरम्यान, नुकतंच अभिनेत्री ऋतुजा बागवेनेही घोडबंदर रोडवरील खड्ड्यांची भीषण परिस्थिती दाखवत प्रताप सरनाईकांना जाब विचारला होता. अशातच आता विदिशा म्हसकरने पोस्ट शेअर करीत तिची नाराजी व्यक्त केली आहे.
तसंच अभिनेता आस्ताद काळे, मिलिंद फाटक, अभिनेत्री सुरभी भावेसह अनेक कलाकारांनी ठाणे-घोडबंदर रोडबद्दल वेळोवेळी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. संताप व्यक्त करण्याबरोबरच रस्त्यांच्या या दुरवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंतीसुद्धा अनेकदा केली आहे. अशातच विदिशा म्हसकरनं या रस्त्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.