Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पारू’ मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झाली होती. सध्या विविध मालिकांचं शूटिंग मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी, मढ आयलंड परिसरात केलं जातं. मात्र, ‘पारू’ मालिकेचं शूटिंग साताऱ्यात एका आलिशान व्हिलामध्ये केलं जायचं.
‘पारू’ मालिकेत किर्लोस्करांचा जो व्हिला दाखवण्यात आला आहे त्याचं नाव आहे ‘सेरेनिटी व्हिला’. गेली दीड वर्षे या मालिकेचं शूटिंग या व्हिलामध्ये केलं जात होतं. सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाजवळ असलेल्या दहिवड-आष्टी गावात हा बंगला आहे. या व्हिलाच्या आजूबाजूला निसर्गरम्य परिसर पाहायला मिळतो. मात्र, आता इथून पुढे या व्हिलामध्ये ‘पारू’चं शूटिंग होणार नाहीये. या मालिकेचं साताऱ्यातील शूटिंग संपलेलं आहे. याबद्दल प्रसाद जवादे ( आदित्य ) व अमृता देशमुख यांनी व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
‘पारू’ मालिकेच्या शूटिंगसाठी प्रसाद गेली दीड वर्षे आपल्या कुटुंबीयांसह साताऱ्यात राहत होता. याठिकाणी त्यांनी सुंदर असा फ्लॅट भाड्याने घेतला होता. या घराची झलक अमृता देशमुखने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये दाखवली आहे.
अमृता म्हणते, “प्रसाद आणि मी आमचं हे साताऱ्यातील घर आहे ते सोडून जाणार आहोत. कारण, पारू मालिकेचं शूटिंग आता मुंबईत सुरू होणार आहे. गेली दीड ते दोन वर्षे या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू होतं. यानिमित्ताने आम्ही सुद्धा साताऱ्यात राहत होतो. या घराने आम्हाला खूप काही दिलं. साताऱ्यात राहून खरंच खूप छान वाटलं.”
पुढे प्रसाद जवादे म्हणाला, “माझ्या आईची प्रकृती या साताऱ्याच्या घरात पूर्णपणे बरी झाली. ती आता खूप छान आहे. त्यामुळे या घराबरोबर आमच्या खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.”
दरम्यान, ‘पारू’ मालिकेचं शूटिंग आता मुंबईत सुरू होणार आहे. सध्या या मालिकेत पारू अहिल्याचं मन जिंकून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतेय. यामध्ये प्रसाद जवादेसह अभिनेत्री शरयू सोनावणे प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात पारू आणि आदित्यला अनुक्रमे सर्वोत्कृष्ट मुलगी व मुलगा या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.