सध्या सोशल मीडियावर ‘बचपन का प्यार’ या गाण्याने धुमाकुळ घातला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून अनेक नेटकरी या गाण्यावर धमाल व्हिडीओ शेअर करत आहेत. यातच आता मराठीमोळं क्यूट कपल उमेश कामत आणि प्रिया बापटला देखील या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरलेला नाही.

उमेश आणि प्रियाने देखील ‘बचपन का प्यार’ या व्हायरल गाण्यावर रील शेअर केलंय. उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत उमेशने ब्लेझर परिधान केल्याचं पाहायला मिळतंय. तर प्रिया देखील रेड ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. उमेश आणि प्रियाने अगदी मजेशीर अंदाजात धमाल केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. “बचपन का प्यार…आणि काय हवं ?” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.

हे देखील वाचा: “बचपन का प्यार” व्हायरल गाण्याने अनुष्का शर्माची उडवली झोप

तर प्रिया आणि उमेशचा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांना देखील पसंत पडला आहे. अभिनेत्री मिथिला पालकरने या व्हिडीओवर ‘क्यूट’ अशी कमेंट केलीय. तर अभिनेत्री अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली, “अरे बापरे ..मला विश्वास बसत नाहिय तुम्ही लोकांनी हे केलं.” असं म्हणत अमृताने हसणारे इमोजी दिले आहेत.

उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी लवकरच “आणि काय हवं” या वेब सीरिजच्या तीसऱ्या सिझनमध्ये झळकणार आहे. तिसऱ्या सिझनमध्ये जूई आणि साकेतच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं नातं कोणत्या वळणावर येऊन पोहचलं आहे हे पाहायला मिळणार आहे.