बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता वरुण धवन हा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतोच. वर्षाच्या सुरवातीला वरुण आणि त्याची बाल-मैत्रीण नताशा दलाल लग्न बंधनात अडकले. त्यांच लग्न हे बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित लग्न होते. रिलेशनशिपमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर वरुण आणि नताशा २४ जानेवारी रोजी अलिबागच्या द मॅन्शन रिसॉर्टमध्ये लग्न केले. या सोहळ्याचे निमंत्रण केवळ त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळींना देण्यात आले होते. मात्र, आता वरुणने आपल्या लग्नाच्या सात महिन्यांनंतर आपण हा सोहळा इतक्या कमी लोकांच्या उपस्थितीत का पार पाडला याबद्दल खुलासा केला आहे.

वरुण आणि नताशाचा लग्न सोहळा बॉलिवूडमधील बहुचर्चित समारंभापैकी एक होता. वरुणने जेव्हा लग्न केले तेव्हा कोविडचा प्रादुर्भाव जास्त होता. त्यामुळे ते जास्तं काळजी घेत होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर आता आपल्या लग्नाला एवढी कमी लोक का होती या बाबत त्याने खुलासा केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, कोविड काळात सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करणे ही माझी जबाबदारी आहे. तसेच मला देखील माझे लग्न जास्त मोठ्या प्रमाणात करायचे नव्हते. जे काही आहे त्याचा आदर केला पाहिजे. माझ्या कुटुंबात वयस्कर मंडळी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मी कमी माणसांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पाडण्याचे ठरवले.”

वरुणचा लग्न सोहळा जरी कमी लोकांच्या उपस्थित संपन्न झाला असला तरी लग्नापूर्वीचे कार्यक्रम जोरदार साजरे झाले होते. वरुण-नताशाच्या लग्न सोहळ्याला फक्त ५० लोकांची उपस्थिती होती. या यादीत करीम मोरानीची मुलगी झोआ मोरानी, कुणाल कोहली, करण जोहर, मनीष मल्होत्रा यांचा समावेश होता. वरुण आणि नताशा बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. वरुणने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला नताशा आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दल जगजाहीर केले नव्हते. मात्र या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र पाहिले गेले होते. वरुणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो नुकताच ‘कूली नंबर १’या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकला होता. तसंच तो ‘भेडीया’, ‘जुग जुग जियो’ अश्या अनेक चित्रपटात झळकणार आहे.