मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी मुंबई विभागातील ४, पुणे विभागातील ३, सोलापूर विभागातील दोन, नागपूर आणि भुसावळ विभागातील एक कर्मचाऱ्याला सुरक्षा पुरस्कार प्रदान केला. तसेच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या विस्तार आणि पुनर्बांधणी दरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाव्यवस्थापकांनी महिला अभियंत्यांचा मंगळवारी सत्कार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील महिन्यात कर्तव्यादरम्यान सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे वाहतुक सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षण कार्याचे प्रशस्तीपत्रक आणि दोन हजार रुपये रोख देण्यात आले. सीएसएमटी फलाट क्रमांक १२/१३ च्या फलाट विस्तार आणि पुनर्बांधणीचे उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कल्याण येथील सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन (बांधकाम) येथील कनिष्ठ अभियंता साक्षी गुप्ता यांचाही महाव्यवस्थापकांनी सन्मान केला. त्यांना पदक, प्रशंसा प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल येथील मोटरमन एस. त्रिनाथ राव ठाणे-पनवेल लोकलमध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी पनवेल स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर एक दिव्यांग व्यक्ती रेल्वे रूळावरून चढण्याचा प्रयत्न करताना राव यांना दिसली. यावेळी राव यांनी त्या माणसाला सावध करण्यासाठी हॉर्न वाजवला आणि ताबडतोब आपत्कालीन ब्रेक लावून सुरक्षित अंतरावर लोकल थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला आणि दुर्दैवी घटना टळली.

कल्याण येथील मोटरमन अजाब बांते मुलुंड-ठाणे लोकलमध्ये कर्तव्यावर असताना रेल्वे रूळांवर ३ ते ४ लोखंडी सळया पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावून सुरक्षित अंतरावर लोकल थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि सावधगिरीमुळे संभाव्य अपघात टळला. दादर येथील (विज्ञान आणि तंत्रज्ञान) कनिष्ठ अभियंता प्रियांशु कर्तव्यावर असताना रेल्वे रूळाला तडा गेल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत झाली. वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रुपाली कदम या चुनाभट्टी स्थानकावर कर्तव्यावर असताना लोकलमधून उतरताना एका महिलेचे कपडे लोकलमध्ये उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेच्या बॅगेत अडकल्याचे लक्षात आले. लोकल सुरू झाल्यावर महिला प्रवासी पुन्हा आत ओढली गेली. परंतु, कदम यांच्या समयसूचकतेमुळे त्यांनी तातडीने योग्य कार्यवाही करून महिलेला दुखापत होण्यापासून वाचवले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 railway employees of central railway honored with general manager award mumbai print news zws