मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या फेरीत परराज्यातील १५२ विद्यार्थ्यांनी राज्य कोट्यांतर्गत बनावट कागदपत्रे सादर करून अर्ज केला असल्याचे उघडकीस आले आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खासगी महाविद्यालयातील जागा अडवून तिचे मूल्य वाढवण्याचा प्रयत्न शिक्षण क्षेत्रातील दलालांकडून केला जातो.
यामुळे राज्यातील गुणवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान हाेते. यांसदंर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत सीईटी कक्षाने संबंधित विद्यार्थ्यांना नोटीस पाठवत दोन दिवसांत मूळ कागदपत्रे सादर न केल्यास त्यांना तिसऱ्या फेरीतून वगळण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची राज्य कोट्यांतील प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षाकडून राबविण्यात येते. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून तिसऱ्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर यामध्ये नव्याने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आले आहे.
अर्ज केलेल्या या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय कोट्यातून किंवा त्यांच्या राज्यातील कोट्यातून यापूर्वीच प्रवेश घेतला असल्याचे यादीतील नावावरून स्पष्ट होत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांकडून सीईटी कक्षाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची सीईटी कक्षाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये १५२ विद्यार्थ्यांची कागदपत्रे चुकीची असल्याचे प्रथमदर्शी आढळून आले. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे राजस्थानमधील आहेत. त्यामुळे राज्य कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असत
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या परराज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेण्यामध्ये कोणताही रस नसतो. मात्र प्रवेश प्रक्रियेतील दलालांकडून या विद्यार्थ्यांच्या संमतीने महाराष्ट्रातील राज्य कोट्यांतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नोंदणी केली जाते. या विद्यार्थ्यांचे गुण चांगले असल्याने गुणवत्ता यादीत त्यांना स्थान मिळते. प्रवेशावेळी हे विद्यार्थी उपस्थित राहत नाहीत. परिणामी राज्यातील जागा रिक्त राहते. त्यामुळे महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असला तरी दलालांच्या या खेळीमुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त राहणारी जागा अखेरच्या क्षणी पैसे मोजणाऱ्या पालकाच्या विद्यार्थ्याच्या पदरात पडत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
कागदपत्रे सादर न केल्यास प्रवेश होणार रद्द
बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रथमदर्शनी आढळल्यानंतर सीईटी कक्षाने या १५२ विद्यार्थांना ईमेलद्वारे नोटीस पाठवली आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा मूळ व अस्सल कागदपत्रे सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कागदपत्रे १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मूळ कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे तिसऱ्या वैद्यकीय प्रवेश फेरीतून वगळण्यात येईल, असे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.