राज्यात अमरावतीमधील रुग्णवाढ कायम असून आठवडाभरात शहर आणि ग्रामिण भाग मिळून नव्या रुग्णांमध्ये सरासरी १८ टक्यांनी भर पडली आहे, तर मृतांमध्ये सहा टक्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. रुग्णवाढ अशीच राहिल्यास काहीच दिवसांत खाटा आणि मनुष्यबळ अपुरे पडण्याची शक्यता आहे. संसर्गाचा प्रकार पूर्वीसारखा नसून अधिक तीव्रतेने याचा प्रसार होत असल्याचे निरीक्षण जिल्हा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून आठवडय़ात एक टक्यांनी रुग्णसंख्या वाढली आहे. विशेषत: विदर्भातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असून अमरावतीत सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद झाली आहे. अमरावती शहर भागात आठवडय़ात २१ टक्कय़ांनी रुग्णवाढ झाली असून मृतांमध्ये आठ टक्कय़ांनी वाढ झाली आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. अचलपूरमधील बाजारात मध्यप्रदेशमधून दळणवळण अधिक होते. त्यामुळेही रुग्णसंख्या वाढत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांना धास्ती

अमरावतीमध्ये जिल्हा रुग्णालयात ३०० खाटा असून पालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयांसह ५०० खाटा उपलब्ध आहेत. सध्या दर दिवशी जवळपास ८०० नवे रुग्ण सापडत आहेत. अनेक डॉक्टरही बाधित होत आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही भीती पसरली असून पुढील काही दिवस याच संख्येने रुग्ण आढळल्यास खाटांसह मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

मृतांच्या  संख्येत घट..

* जिल्ह्यात १२०० खाटा उपलब्ध असून तेथे ८०० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. तालुका स्तरावरही खाटा उपलब्ध करण्याची तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे. उपचारांमध्ये खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला जात आहे. त्याचप्रमाणे चाचण्या करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मृतांचे एकूण प्रमाण वाढले असले तरी यात ९९ टक्के रुग्ण हे ७० वर्षांवरील आणि सहव्याधी असलेले आहेत. त्यातही रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी २४ तासांत मृत्यू झालेले रुग्ण २ आहे. त्यानुसार रुग्ण प्रादुर्भाव बळावण्यापूर्वी दाखल होत असल्याचे दिसून येते,’ असे अमरावती जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.

अकोल्यातही संसर्गाचे प्रमाण वाढत असून आठवडाभरात शहरी भागांत ११ टक्के आणि ग्रामीण भागात सात टक्कय़ांनी रुग्णसंख्या वाढली आहे. वर्धा आणि बुलढाण्यातही नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या या आठवडय़ात पाच टक्कय़ांनी वाढल्याची नोंद आहे. यवतमाळमध्येही जवळपास पाच टक्कय़ांनी रुग्णवाढ झाली असून मृतांचे प्रमाणही २ टक्कय़ांनी वाढले आहे. वाशिममध्येही चार टक्के रुग्ण वाढ नोंदली गेली आहे. नागपूर ग्रामीण भागांत चार टक्के आणि शहरी भागात दोन टक्क्य़ांनी रुग्णसंख्या वाढली आहे.

जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचण्यांसाठी बाधित झालेल्यांपैकी सौम्य,मध्यम, तीव्र लक्षणे असलेले रुग्ण आणि मृतांचे प्रत्येकी २५ नमुने घेतले जातात. मात्र, मृतांचे प्रमाण अधिक नसल्याने सध्या त्यांचे नमुने घेण्यात आलेले नाहीत. अमरावती, यवतमाळ आणि नागपूरमधील प्रत्येकी १०० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून यांचे अहवाल पुढील आठवडय़ात येतील, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

रुग्ण आणि मृतांचे प्रमाण वाढलेले अन्य जिल्हे

जळगाव (मनपा), जालना, लातूर(मनपा), परभणी(मनपा), रत्नागिरी येथे दोन टक्कय़ांनी, तर मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यात प्रत्येकी एका टक्कय़ांनी रुग्णसंख्या वाढली आहे. रायगड, रत्नागिरी, आणि लातूरमध्ये मृतांच्या प्रमाणात प्रत्येकी दोन टक्के आणि उल्हासनगर (मनपा),  नाशिक, नंदुरबार आणि बीडमध्येही मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे.