मुंबई : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात बेकायदेशीर वन्यजीव व्यापार करणाऱ्यांवर वन विभागाने गुरुवारी संयुक्त धाड टाकली. या कारवाईत २२६ संरक्षित प्राणी-पक्षी जप्त करण्यात आले असून, आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वन्यजीव विभाग ठाणे, वनविभाग ठाणे, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो (डब्लूसीसीबी) , गस्ती पथक ठाणे, गस्ती पथक वाडा, गस्ती पथक भालीवली, वनपरिक्षेत्र वन्यजीव मुंबई आणि वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन यांच्या पथकांनी ही कारवाई केली. संस्थेच्या गुप्त माहिती संकलन व प्रत्यक्ष सहाय्यामुळे ही जप्ती शक्य झाली. दरम्यान, जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये १० अलेक्झांड्रियन पोपट , ११२ रिंग नेक पोपट (त्यापैकी ११ मृत अवस्थेत), ६७ इंडियन स्टार कासव, १० इंडियन टेंट कासव, १६ इंडियन रूफ्ड कासव, १० इंडियन आय कासव आणि १ इंडियन सॉफ्टशेल कासव यांचा समावेश आहे. सर्व प्राणी सुरक्षितस्थळी हलवून वैद्यकीय तपासणी व काळजीची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, ठाणे प्रादेशिक, उपवनसंरक्षक ठाणे वन्यजीव, विभागीय वनाधिकारी दक्षता पथक ठाणे, सहाय्यक वनसंरक्षक फणसाड व ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली. वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव मुंबईच्या शिल्पा शिगवण, वनपाल संजय गिरी आणि वनरक्षक राकेश पाटील आदींनी केली. ही जप्ती वन्यजीव तस्करांसाठी इशारा असून संरक्षित प्रजातींचा बेकायदेशीर व्यापार करताना आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकांनी अवैधरित्या वन्यजीव बाळगणे, विक्री करणे किंवा शिकार करणे याची माहिती मिळताच नजीकच्या वनविभागाला किंवा टोल फ्री क्र. १९२६ वर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी विमानतळावरून जप्त
यापूर्वी जून महिन्यात बॅंकॉकहून एका प्रवाशाने तस्करी करून आणलेले १६ दुर्मीळ प्रजातीचे साप सीमा शुल्क विभागाने जप्त केले होते. याप्रकरणी एका प्रवाशावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तपासणीअंती या प्रवाशाच्या सामानात दुर्मीळ प्रजातीचे एकूण १६ साप आढळले. त्यात २ गार्टर, ५ राईनोसोरस रॅट, १ अल्बिनो रॅट, २ केनियन सॅण्ड बोआ, १ कोस्टल बॅंडेड कॅलिफोर्निया किंग आणि ५ अल्बिनो होंडुरन मिल्क सापांचा समावेश आहे. हे सर्व साप जिवंत होते. याचबरोबर आणखी एका घटनेत विमानतळावर थायलंडहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांकडे १२१ दुर्मीळ वन्यप्राणी सापडले होते. त्यात दोन सुमात्र पट्टेदार ससे, ठिपकेदार एक कस्कस, सरडा (तीन जीवंत, एक मृत), ११५ ग्रीन इगुआना सापडले होते. त्यातील कुस्कस आणि ग्रीन इगुआना हे प्राणी संरक्षित प्रजातींमध्ये समाविष्ट आहेत.
पर्यटनाच्या नावाखाली तस्करी
दरवर्षी थायलंडमधील बँकॉकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यंटक जात-येत असतात. त्याचाच फायदा घेऊन त्या मार्गावरून तस्करीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. दुर्मिळ प्राण्यांची मोठ्या प्रामाणात तस्करी केली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये बँकॉकहून भारतात दुर्मीळ प्राण्यांच्या तस्करीत वाढ झाली आहे. अनेक कारवायांमध्ये सीमाशुल्क विभागाने अशा दुर्मीळ प्राण्यांची सुटका केली आहे.
परदेशी प्राणी, पक्ष्यांचे आकर्षण
परदेशी प्राणी तसेच पक्षी यांचे आकर्षण वाढत असल्याने गेल्या काही वर्षात परदेशातून दुर्मिळ प्राणी तसेच पक्ष्यांच्या तस्करीत वाढ झाली आहे. तस्करी करुन आणले जाणारे प्राणी, पक्षी हे लहान खोक्यातून किंवा बंद डब्यातून आणले जातात. ज्यामुळे अनेकदा प्राणी, पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. परदेशातून केल्या जाणाऱ्या तस्करीमुळे वन्यप्राण्यांचे मात्र अतोनात हाल होतात. या तस्करी मुळे आत्तापर्यंत अनेक दुर्मीळ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे.