Mumbai Local Train Death Cases : गेल्या साडेसात वर्षांत म्हणजेच जानेवारी २०१८ ते मे २०२५ या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताना ८,२७३ प्रवाशांचा मृत्यू झाला. रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची कबुली मध्य रेल्वेने सोमवारी उच्च न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करून दिली. तथापि, हा मृत्यूदर गेल्या काही वर्षांपासून घटत असल्याचा दावाही मध्य रेल्वेने केला.

गेल्या महिन्यात मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या बहुस्तरीय समितीने अहवाल तयार केल्याचे आणि त्या अहवालाची सध्या अंतर्गत समीक्षा सुरू असल्याचेही मध्य रेल्वेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना मध्य रेल्वेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली.

उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा मुद्दा पालघरस्थित यतीन जाधव यांनी गेल्या वर्षी जनहित याचिका करून न्यायालयाच्या निदर्शनास आणला होता. मुंब्रा घटनेनंतर गेल्या महिन्यात या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, मुंब्रा येथील घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले होते. तसेच, गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून होणारे मृत्यू कसे रोखणार? त्यासाठी उपाययोजना करून त्यांची अंमलबजावणी कधीपर्यत करणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करून न्यायालयाने मध्य रेल्वेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

त्याचप्रमाणे, मुंब्रा येथील दुर्घटनेच्या चौकशीबाबतही माहिती देण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रतिज्ञापत्र सादर करून साडेसात वर्षांत आठ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवासादरम्यान जीव गमावल्याचे सांगितले.

रुळ ओलांडताना झालेले अपघात

२०१८ (१०२२ मृत्यू), २०१९ (९२० मृत्यू), २०२० (४७१ मृत्यू), २०२१ (७४८ मृत्यू) , २०२२ (६५४ मृत्यू), २०२३ (७८२ मृत्यू), २०२४ (६७४), २०२५ (मे महिना) (२९३ मृत्यू)

धावत्या रेल्वेतून पडून झालेले मृत्यू

२०१८ (४८२ मृत्यू), २०१९ (४२६मृत्यू), २०२० (१३४ मृत्यू), २०२१ (१८९ मृत्यू) ,२०२२ (५१० मृत्यू), २०२३ (४३१ मृत्यू), २०२४ (३८७ मृत्यू),२०२५ मे महिना (१५० मृत्यू).