मुंबई : अस्सल मुंबईकर ‘खडूस’पणा आणि आधुनिक युगाला साजेशा आक्रमकतेचा संगम असलेली फलंदाजी, प्रतिकूल परिस्थितीतही अकल्पित विजयाकडे नेणारे अविचल नेतृत्व, वलयवर्तुळात वावरूनही व्यक्तिमत्त्वात असलेला लोभसवाणा साधेपणा असे विविध पैलू असलेला क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यंदा ‘लोकसत्ता गप्पा’चे मुख्य आकर्षण असेल. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

  येत्या बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी मुंबईत या गप्पा रंगतील. केसरी टूर्स सहप्रायोजक असलेल्या या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर लागू बंधू असून, बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड हे आहेत. कार्यक्रम निमंत्रितांसाठी राखीव आहे. क्रिकेटप्रेमी ज्येष्ठ रंगकर्मी विनय येडेकर आणि ‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर अजिंक्यशी संवाद साधतील.

दादर शिवाजी पार्क परिसरात न राहताही, मुंबईच्या उपनगरांतून येऊन क्रिकेटमध्ये ठसा उमटवणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंपैकी अजिंक्य एक ठरतो. मूळच्या डोंबिवलीकर अजिंक्यने मुंबई क्रिकेटमध्ये विविध वयोगटांत नैपुण्य मिळवले. पुढे मुंबईसाठी रणजी हंगामात सातत्याने कामगिरी करत अजिंक्यने भारतीय संघात स्थान मिळवले आणि पक्के केले. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा ‘अजिंक्यतारा’ तळपला. परदेशी मैदानांवर सहसा भारतीय फलंदाजांचा निभाव लागत नाही, या समजाला अजिंक्य नेहमीच खणखणीत अपवाद ठरला. पहिले कसोटी शतक, पहिले एकदिवसीय शतक त्याने परदेशी मैदानांवर झळकवले. घरच्या मैदानांपेक्षा परदेशी मैदानांवर अधिक शतके व अर्धशतके झळकवणाऱ्या दुर्मीळ प्रतिभावानांपैकी तो एक.

फलंदाजीइतकीच नेतृत्वातही अजिंक्यने संधी मिळेल तशी आणि तेव्हा चमक दाखवली. ऑस्ट्रेलियातील भारताच्या गतवर्षी मिळवलेल्या दिमाखदार मालिका विजयाचा अजिंक्य एक सूत्रधार होता. त्या मालिकेत पहिल्या कसोटीत दारूण पराभव झाल्यानंतर आणि पुढील सामन्यांमध्ये भारताचे प्रमुख क्रिकेटपटू सातत्याने जायबंदी होत असतानाही अजिंक्यच्या निर्धारपूर्ण, अविचल नेतृत्वाने भारताला एक असामान्य मालिका विजय मिळवून दिला. त्या मालिकेत मेलबर्न कसोटी सामन्यात अजिंक्यने ठोकलेल्या झुंजार शतकाची चर्चा आजही होते. ते शतक त्या सामन्यातील आणि मालिकेतील भारताच्या विजयासाठी मोलाचे ठरले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A meeting with an cricketer ajinkya rahane in loksatta gappa on wednesday ysh