सिंचनक्षेत्रातील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे संतप्त होऊन उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ‘फेकणारे’ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार उद्या, शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळात पुन्हा शिरकाव करीत आहेत. उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी राजभवनमध्ये होत आहे. अवघ्या अडीच महिन्यांत ते सत्तेच्या वर्तुळात परतत आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत अवाक्षरही काढण्यात आलेले नसले तरी त्यात ‘क्लीन चिट’ मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला व त्यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज राजभवनात मंत्रिपदाचा शपथविधी
अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र सादर करण्यात आले. बुधवारी रात्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. काँग्रेसच्या कोटय़ातील मंत्रिमंडळात तीन जागा रिक्त असल्या तरी उद्या फक्त त्यांचाच शपथविधी होईल. काँग्रेसच्या कोणत्याही सदस्याचा शपथविधी होणार नाही.
अजित पवार यांनी २५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सिंचन घोटाळ्याची चौकशी तसेच खर्चाची कारणमीमांसा करण्यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, सत्तेबाहेर राहण्याची सवय नसलेल्या अजितदादांना मंत्रिमंडळातील फेरप्रवेशाची घाई झाली होती. सिंचनाची श्वेतपत्रिका हिवाळी अधिवेशनात सादर केली जाईल, असे आधी जाहीर करण्यात आले होते. पण, हिवाळी अधिवेशनापूर्वी फेरप्रवेश व्हावा म्हणून ही श्वेतपत्रिका अधिवेशनापूर्वीच सादर करण्याची घाई राष्ट्रवादीकडून करण्यात आली. गेल्या गुरुवारी मंत्रिमंडळासमोर श्वेतपत्रिका सादर झाल्यावरच अजितदादांचा फेरप्रवेश होणार अशी चर्चा सुरू झाली होती. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन तो स्वीकारणे अजित पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वाला भाग पाडले होते. अजितदादांच्या राजीनाम्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पसंत पडला नव्हता हे त्यांच्या वक्तव्यावरून तेव्हा स्पष्ट झाले होते. अजितदादा किती काळ बाहेर राहणार अशी चर्चा होत होती. अखेर अजितदादांचा आग्रह पक्षनेतृत्वाने मान्य केला. अजितदादांच्या समर्थकांनी त्यांचा मंत्रिमंडळात लवकर समावेश व्हावा, अशी मागणी केली होती. सिंचन घोटाळ्यांवरून सभागृहात होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार हे मंत्रिमंडळात असणे आवश्यक असल्याची भावना पक्षात निर्माण झाली होती.     

जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी
अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील फेरप्रवेशानिमित्त उद्या शपथविधीच्या वेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. अजितदादांचे समर्थक मोठय़ा प्रमाणावर सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळात परतलेले अजितदादा मुख्यमंत्री व काँग्रेसची कोंडी करण्याची संधी सोडणार नाहीत, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.

*     हा अटकपूर्व जामीन मिळविण्याचाच प्रकार – भाजपा<br />*     अजित पवारांचा राजीनामा हे तर निव्वळ नाटक – शिवसेना
*     मुख्यमंत्र्यांनी जनतेचा विश्वासघात केला – मनसे
*     शपथविधीवर भाजपाचा बहिष्कार

‘ही तर कार्यकर्त्यांची इच्छा’
मंत्रिमंडळात परतण्यासाठी अजित पवारच आग्रही होते, अशी चर्चा एकीकडे सुरू असताना खुद्द अजित पवार यांनी ‘ही कार्यकर्त्यांचीच इच्छा’ असल्याचे गुरुवारी नवी मुंबईत सांगितले. आपण पुन्हा उपमुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्ते,आमदार आणि पूर्वाश्रमीच्या सहकारी मंत्र्यांची इच्छा असल्याचे वाशी येथे अजित पवार यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Again entry of ajitdada