लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत असह्य उकाडा जाणवू लागला असून प्रचंड गर्दी, धक्काबुक्की आणि घामाच्या धारांनी प्रवासी कमालीचे अस्वस्थ होत आहेत. यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने नुकत्याच वातानुकूलित लोकलच्या १४ फेऱ्या वाढविल्या. आता हार्बर मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.

देशातील पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये धावली. त्यानंतर मध्य रेल्वेने जानेवारी २०२० रोजी ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे – पनवेल दरम्यान पहिली वातानुकूलित लोकल सुरू केली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी – कल्याण मार्गावर दुसरी वातानुकूलित लोकल चालविण्यास सुरूवात केली. अल्प प्रतिसादामुळे ट्रान्स हार्बवरील वातानुकूलित लोकल बंद करण्यात आली.

हार्बर मार्गावर जानेवारी २०२२ मध्ये सीएसएमटी – वाशी/ पनवेल आणि सीएसएमटी – वांद्रे / गोरेगावदरम्यान वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आली. परंतु, सामान्य लोकल सेवा बंद करून वातानुकूलित लोकल सुरू केल्याने, या मार्गावरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद कमी मिळू शकला नाही. प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे सीएसएमटी – पनवेल, गोरेगाव हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल सेवा मे २०२२ पासून बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. हार्बर मार्गावरील वातानुकूलित फेऱ्यांऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या चालविण्यास सुरुवात केली. तर, हार्बर मार्गावरील वातानुकूलित फेऱ्या बंद करून त्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या.

हार्बर मार्गावर १४ वातानुकूलित लोकल फेऱ्या ?

हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून या वेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवण्यात येणार आहे. या मार्गावर सुमारे १४ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. यामधील सात अप आणि सात डाऊन मार्गावर धावतील. सीएसएमटी – पनवेल, वाशी – वडाळा, वडाळा – पनवेल, पनवेल – सीएसएमटी अशा फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी एक फेरी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी दोन फेऱ्या धावतील.

सुट्टीच्या दिवशी सामान्य लोकल फेऱ्या

हार्बर मार्गावर सोमवार – शनिवारदरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतील. तर, रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी वातानुकूलित ऐवजी सामान्य लोकल फेऱ्या धावतील.

हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन आहे. नुकताच मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक वातानुकूलित लोकल दाखल झाली असून, त्याचा वापर हार्बर मार्गावर केला जाईल. -डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर १,८१० लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३९ लाख प्रवासी प्रवास करतात. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून दरररोज ६६ वातानुकूलित लोकलमधून ७८ हजार प्रवासी प्रवास करतात. नुकताच या मार्गावर १४ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या असून आता या मार्गावर एकूण ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत.

चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाली आहे. त्याची चाचणीअंती ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे.